
Devendra Fadnavis On Nitesh Rane : नीतेश राणेंच्या वादग्रस्त विधानावरून मुख्यमंत्री नाराज?
मुंबई : “कोणी कितीही नाचले तरी ‘बाप’ भाजपचा मुख्यमंत्रीच आहे,” या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप आमदार नितेश राणे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. युतीतील शिवसेना (शिंदे गट) नेत्यांनी या विधानाचा तीव्र निषेध करत थेट राज्य मंत्रिमंडळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.
मंत्रिमंडळात शिवसेना मंत्र्यांचा फडणवीसांना थेट सवाल
“आमचा बाप शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?” असा रोखठोक सवाल शिवसेना मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस यांना विचारला. त्यावर फडणवीस यांनी “’बाप’ असा उल्लेख अयोग्य आहे” असे सांगत राणेंना समज दिल्याचे स्पष्ट केले.
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजावरून युतीत सुरू असलेला संघर्ष अधिक उफाळून आला आहे. आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी समितीच्या निर्णयांवर आक्षेप घेतल्यावर नितेश राणे यांनी शिवसेना नेत्यांना लक्ष्य करत ‘बाप भाजपचा मुख्यमंत्रीच आहे’ असा टोला लगावला होता.
राणे यांनी आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला असल्याचा खुलासा केला असला, तरी फडणवीस यांनी त्यांना “राजकारणात शब्दांच्या अर्थाची व्याप्ती समजून जपून बोलावं लागतं,” अशा शब्दांत सजगतेचा सल्ला दिल्याचे समजते.



