मुंबई

Mumbai Bribe News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी कारवाई : शिधावाटप अधिकारी ₹२०,००० लाच स्वीकारताना रंगेहात अटक

मुंबई | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई युनिटच्या पथकाने १ सप्टेंबर २०२५ रोजी कारवाई करत शिधावाटप अधिकारी सचिन बळीराम आत्राम (३८) यांना ₹२०,००० लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

फिर्यादी हे कांदिवली येथील शिधावाटप दुकानात मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. दुकानात तांदळाचा ट्रक उतरवला जात असताना आरोपी आत्राम यांनी जीपीएस बंद ठेवला असल्याचा व निरीक्षक अनुपस्थितीत माल उतरवल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यातून बचाव व्हावा यासाठी त्यांनी स्वत: व डेप्युटी कंट्रोलर रेशनिंगसाठी मिळून ₹२०,००० लाचेची मागणी केली.

फिर्यादीने लाच न देता दि. २५ ऑगस्ट रोजी एसीबीकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी २६ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी पंचासमक्ष करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपीने लाच मागणी व स्वीकार मान्य केल्याचे स्पष्ट झाल्याने १ सप्टेंबर रोजी सापळा रचण्यात आला. त्यावेळी आरोपीला पंचासमक्ष फिर्यादीकडून रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.

या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंद क्रमांक २७/२०२५ दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन थोरात यांच्या पर्यवेक्षणाखाली, सहाय्यक पोलीस आयुक्त हरिदास किल्लेदार यांच्या तपासात, अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण, अपर पोलीस उप आयुक्त अनिल घेरडीकर व राजेंद्र सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने लाचेची मागणी केल्यास तातडीने तक्रार नोंदवावी.

👉 तक्रारीसाठी संपर्क क्रमांक :
📞 022-24921212 / 022-24922618
📞 टोल-फ्री हेल्पलाईन : 1064

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0