Clean Up Drive Juhu Beach : ‘स्वच्छता मोहीम’ राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त उद्या जुहू बीच स्वच्छ करणार!
•राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जुहू बीचवर स्वच्छता मोहीम राबविणार
मुंबई :- नागरिकांमध्ये सागरी प्रदूषणाविषयी जागृती करणे आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे या उद्देशाने आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (शनिवार,21 सप्टेंबर) सकाळी 7.00 वाजता जुहू किनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय वने, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, युवा संघटना, राष्ट्रीय छात्र सेना, सागरी सुरक्षा दल सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय किनारी अभियान योजनेअंतर्गत सर्व 13 किनारी राज्यांमध्ये उद्या (21 सप्टेंबर ) आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गेल्या 4 वर्षांपासून देशात सागरी किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. या दिवशी राज्यातील सागरी किनाऱ्यावरील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने सागरी किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.