क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Child Kidnapping News : मुंब्रा पोलिसांची ‘फिल्मी’ स्टाईल कामगिरी! 3 महिन्यांच्या आफियाची अकोल्यातून सुटका; 1600 सीसीटीव्ही कॅमेरे आणि ‘बाळाच्या सॉक्स’ने लावला छडा

Thane Police Arrested Child Kidnapping: बुरखाधारी महिला आणि तिच्या साथीदाराला बेड्या; सहा दिवस 16-16 तास अहोरात्र तपास करून चिमुरडीला सुखरूप आणले परत

मुंब्रा/ठाणे | मुंब्रा परिसरातून अवघ्या 3 महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या टोळीचा मुंब्रा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने पर्दाफाश केला आहे. तांत्रिक तपास, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि तब्बल 1600 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासून पोलिसांनी थेट अकोला जिल्ह्यातून आरोपींना ताब्यात घेत चिमुरडीची सुखरूप सुटका केली. या यशस्वी कामगिरीमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मदत करण्याच्या बहाण्याने केले अपहरण

ही घटना 22 जानेवारी 2026 रोजी घडली होती. फिर्यादी फरजाना मन्सुरी या आपल्या दोन मुलींसह रस्ता ओलांडत असताना एक अनोळखी बुरखाधारी महिला त्यांच्याजवळ आली. “तुमची छोटी मुलगी मला द्या, मी पण समोरच जात आहे,” असे म्हणून तिने ३ महिन्यांच्या आफियाला आपल्या कडेवर घेतले आणि फिर्यादीची नजर चुकून ती गर्दीत पसार झाली. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाचा धागा: बाळाच्या पायातील ‘सॉक्स’

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी तात्काळ 4 तपास पथके तयार केली. सीसीटीव्ही तपासताना एक महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या संशयित महिलेने बाळ ज्या कापडात लपेटले होते, त्यातून बाळाच्या पायातील सॉक्स दीड इंच बाहेर आलेले दिसत होते. याच एका खुणेच्या आधारे पोलिसांनी मुंब्रा ते सीएसएमटी आणि मुंब्रा ते वांगणी दरम्यानचे सर्व रेल्वे स्थानके पिंजून काढली.

पोलिसांची दिशाभूल करण्याचा आरोपींचा प्रयत्न

तपासादरम्यान असे दिसून आले की, आरोपींनी पोलिसांना चकवा देण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर बाळाचे कापड आणि स्वतःचा नकाब (बुरखा) बदलला होता. मात्र, पोलिसांनी जिद्द न सोडता मुंब्रा येथील ‘शादी महल’ परिसरातून नसरीन इकलाख शेख या महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या कसून चौकशीत बाळाला अकोला जिल्ह्यातील खेटरी गावात नेल्याचे उघड झाले.

अकोल्यात छापा आणि आरोपींना बेड्या

मुंब्रा पोलिसांच्या पथकाने तात्काळ अकोला गाठले आणि तिथून मोहम्मद मुजीब गुलाब (31 वय) व त्याची पत्नी खैरुणिसा मुजीब मोहम्मद (30 वय) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 3 महिन्यांची आफिया सुखरूप मिळून आली. 6 दिवस दररोज 16 ते 18 तास अहोरात्र काम करून पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला.

या पथकाने बजावली कामगिरी

ही उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे, सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर आयुक्त विनायक देशमुख आणि उपायुक्त सुभाषचंद्र बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत व त्यांच्या पथकाने फत्ते केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0