Chhatrapati Sambhajinagar News : दिल्लीच्या स्फोटानंतर खळबळ! तोतया IAS महिलेचं थेट पाक लष्कराशी ‘कनेक्शन’ उघड

छत्रपती संभाजीनगरमधून अटक केलेल्या कल्पना भागवतवर गुप्तहेर असल्याचा संशय; 6 महिन्यांपासून पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य
छत्रपती संभाजीनगर :- दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क असतानाच, छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) शहरातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. स्वतःला तोतया आयएएस अधिकारी भासवणाऱ्या एका महिलेचे थेट पाकिस्तानच्या लष्करातील अधिकाऱ्यांशी संपर्क असल्याचे उघड झाले आहे.यामुळे देशाच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्न उभे राहिले असून, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा (Intelligence Agencies) आणि दहशतवादविरोधी पथकाने (ATS) या तपासात उडी घेतली आहे.
काय आहे ‘आयएएस’ महिलेचे गूढ?
कल्पना त्रिंबकराव भागवत (वय 25), मूळची पडेगाव, छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे. वडिलांचे शिक्षक असल्याची आणि भाऊ हडको भागात राहत असल्याची माहिती असूनही ती गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या आईसह शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास होती.
तिला तोतया आयएएस म्हणून अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्या घराची झाडाझडती घेतली. तेव्हा पोलिसांना तिच्या घरात 19 कोटी रुपयांचा धनादेश (Cheque), बनावट आयएएस लेटरहेड आणि अनेक संशयास्पद प्रमाणपत्रे आढळली.
पाक लष्कर, अफगाण नेटवर्कशी संपर्क
पोलिसांच्या प्राथमिक तपासात कल्पना भागवत हिच्या मोबाईलमध्ये अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती गेल्या दहा महिन्यांपासून पाकिस्तानच्या लष्करातील अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकाशी आणि अफगाण राजदूतासह एकूण 11 परदेशी क्रमांकांशी नियमितपणे संपर्कात होती.
यापैकी 11 क्रमांकांची कसून चौकशी केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी सुरू केली आहे. तिच्या मोबाईलमधील चॅट हिस्ट्री डिलीट करण्यात आली असली तरी, ती हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ती गुप्तहेर (Spy) आहे की काय, या दिशेने तपास केंद्रित करण्यात आला आहे.
प्रेमसंबंधाचाही ‘अँगल’
तपासादरम्यान कल्पनाचे मोहम्मद अशरफ खिल नावाच्या एका अफगाणिस्तानच्या नागरिकामधील व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. मोहम्मद खिल हा भारतात व्यावसायिक म्हणून वास्तव्य करत आहे.
देशविघातक कृत्याचा संशय बळावल्याने कल्पना भागवत हिला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिच्या पोलीस कोठडीत 10 दिवसांची वाढ केली आहे. दिल्लीतील स्फोट आणि या व्हाईट कॉलर डॉक्टरच्या सहभागाच्या पार्श्वभूमीवर, या महिलेचे पाक लष्कराशी कनेक्शन उघड झाल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.



