Chhatrapati Sambhajinagar Bribe News : “लाचखोरीचा फडशा! पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिक आणि दाजी रंगेहाथ अटकेत”

•फोन पे व्यवहारात लाच स्वीकारणाऱ्या दोघांना अटक; मोबाईल आणि रोख रक्कम जप्त
छत्रपती संभाजीनगर : घर बांधणी अग्रीम (DG लोन) मंजुरीसाठी तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकासह त्याच्या खाजगी नातलगाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईत हे दोघे अडकले असून त्यांच्या मोबाईलसह रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई 23 जून रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात करण्यात आली.
घर बांधणी कर्ज मंजुरीसाठी 3 हजारांची लाच मागणी; सापळा कारवाई यशस्वी
तक्रारदार (वय 32) यांनी जालना जिल्ह्यातील परांडा येथे खरेदी केलेल्या प्लॉटवर घर बांधण्यासाठी ‘डीजी लोन’ मिळविण्याकरिता 7 एप्रिल 2025 रोजी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर अर्जाच्या कार्यवाहीविषयी माहिती घेण्यासाठी तक्रारदार संबंधित कनिष्ठ लिपिक सुभाष नवलू यांच्याकडे गेले. यावेळी नवलू यांनी प्रस्ताव लवकर पाठवण्यासाठी आणि मदतीच्या मोबदल्यात 3000 रुपयांची मागणी केली.
5 मे रोजी नवलू यांनी पुन्हा तक्रारदारास फोन करून कार्यालयात बोलावले व लोन प्रक्रिया लवकर करण्यासाठी पुन्हा 3000 रुपये देण्याची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पडताळणीनंतर नवलू यांनी खाजगी इसम त्यांचे दाजी कमलेश इंदूरकर यांच्या फोन पे नंबरवर रक्कम पाठवण्यास सांगितले.
सदर प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींच्या घरी झडती घेण्यात येत असून मोबाईल तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.
या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद अघाव व उप अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, केशव दिंडे आणि त्यांच्या पथकाने कामगिरी बजावली.



