Scam News : ‘उपमुख्यमंत्र्यांचा स्वीय सहायक’ बनून 55 लाखांची फसवणूक; जळगाव पोलिसांकडून ठाण्यातून मुख्य आरोपीला अटक

Maharashtra Latest Scam News : रेल्वेत नोकरी, म्हाडाचा फ्लॅट देण्याचे आमिष; बनावट ओळखपत्रे आणि लेटरहेडचा वापर
ठाणे :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांचे स्वीय सहायक असल्याचे भासवून तब्बल 18 जणांची 55 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका दाम्पत्याला अखेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. जळगाव पोलिसांनी Jalgaon Police या प्रकरणातील मुख्य आरोपी हितेश रमेश संघवी याला ठाण्यातून Thane अटक केली असून, त्याला शुक्रवार, 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वीच त्याची पत्नी आणि गुन्ह्यातील सहआरोपी अर्पिता संघवी हिलाही अटक करण्यात आली आहे. Maharashtra Latest Crime News
काय आहे प्रकरण?
मूळचे पाचोरा येथील रहिवासी असलेले हितेश आणि अर्पिता संघवी या दाम्पत्याने गेल्या काही महिन्यांपासून जळगाव शहरातील नागरिकांना फसवण्यास सुरुवात केली होती. रेल्वे आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे, तसेच म्हाडाचा फ्लॅट देण्याचे आमिष त्यांनी लोकांना दाखवले. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी या दोघांनी उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट ओळखपत्रे, लेटरहेड आणि नियुक्तीपत्रेही तयार केली होती. या बनावट कागदपत्रांना भुलून अनेक जण त्यांच्या जाळ्यात अडकले.
नोव्हेंबर 2024 पासून आतापर्यंत या दाम्पत्याने हर्षल बारी यांच्याकडून 13 लाख 38 हजार आणि इतर लोकांकडून 42 लाख 22 हजार रुपये असे एकूण 55 लाख 60 हजार रुपये उकळले. जळगावमधील कालिंका माता मंदिर परिसरात एका दूध डेअरीत हे सर्व आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
अखेर गुन्हा दाखल
फसवणूक झालेल्या लोकांनी बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतरही त्यांना नोकरी किंवा फ्लॅट मिळाला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर हर्षल बारी यांनी जळगावमधील शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.
या प्रकरणाचा तपास करत असतानाच पोलिसांनी सुरुवातीला अर्पिता संघवीला अटक केली आणि त्यानंतर तिचा पती हितेश संघवी याचा ठाण्यातून शोध घेऊन त्यालाही अटक केली. आता पोलीस हितेश आणि अर्पिताकडून आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का, याचा तपास करत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने हितेशला 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. यामुळे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.


