Chhagan Bhujbal : ‘पुन्हा कमबॅक’! छगन भुजबळांना मोठं खातं – अन्न व नागरी पुरवठ्याचं पुनःस्वागत
नाराजी, आरोप-प्रत्यारोपानंतर अखेर भुजबळ मंत्रिमंडळात; दिली महत्त्वाची जबाबदारी,”घोटाळा नको – प्रत्येक गरिबाच्या ताटात अन्न पाहिजे!” – भुजबळांचा ठाम निर्धार
मुंबई :- राजकारणात ‘कधी बाहेर तर कधी पुन्हा शिखरावर’ – हे छगन भुजबळ यांचं वर्णन आता पुन्हा एकदा सार्थ ठरतंय. अनेक आठवडे नाराजी, चर्चांना खतपाणी घालत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळात मोठी संधी मिळाली आहे. त्यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेलं हे खातं काही काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होतं. मात्र आता भुजबळांना हे खाते पुन्हा मिळालं असून, राज्य शासनाने याबाबतचा अधिकृत आदेश जाहीर केला आहे. 20 मे रोजी राजभवनात शपथ घेतल्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सक्रिय झालेत.
मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज असलेले भुजबळ यांनी याआधी अनेकदा स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार यांच्यावरही त्यांनी उघडपणे टीका केली होती. अखेर, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यावर राजकीय समीकरणं पुन्हा जुळायला सुरुवात झाली आणि आज ते पुन्हा खातेदार झाले.
“माझ्या खात्यामुळे कोरोना काळातही कोणतीही तक्रार आली नाही. आता हेच खाते पुन्हा मिळालंय, त्यामुळे मी तातडीने काम सुरू करतोय. कोणताही घोटाळा होऊ देणार नाही आणि गरीबांच्या ताटात दर्जेदार अन्न पोहोचवणं हेच माझं उद्दिष्ट राहील,” असं भुजबळ म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितलं, “शिवभोजन केंद्रांबाबत असलेल्या तक्रारी तपासल्या जातील. जे वंचित, भटकंती करणारे, आदिवासी आहेत – त्यांच्यापर्यंत तत्काळ राशन कार्ड पोहोचवून धान्य वाटप करणार आहोत.”
हे खाते पूर्वी भुजबळ यांच्याकडे होतं, नंतर धनंजय मुंडेंना दिलं गेलं आणि आता पुन्हा ‘त्याच जागी, त्याच ताकदीने’ छगन भुजबळ परतले आहेत.


