Chembur Robbery News : मालकाच्या 45 लाखांच्या रोकडवर चालक-नोकराचा डल्ला! चेंबूरमधील घटनेनंतर गोवंडी पोलिसांनी बिहारमधून आरोपींना जेरबंद केले

•Chembur Latest Crime News : रुग्णालयात सूनबाईंना भेटायला गेलेल्या मालकाची गाडीतील पैशांची बॅग घेऊन चालक फरार
मुंबई :- चेंबूर परिसरात आठ दिवसांपूर्वी घडलेल्या एका धाडसी चोरीच्या घटनेत, मालकाची मोटारगाडीत ठेवलेली 45 लाख रुपये रोकड घेऊन चालक आणि त्याचा भाऊ पसार झाले होते. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी मोठी कामगिरी करत, फरार झालेल्या दोन्ही आरोपींना त्यांच्या मूळ गावी बिहारमधून अटक केली असून, त्यांच्याकडून 36 लाख रुपये हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
वडाळा येथील रहिवासी असलेले तेजप्रकाश डांगी (58 वय) हे 19 सप्टेंबर रोजी मित्राने दिलेले कामाचे 45 लाख रुपये घेऊन घरी जात होते. दरम्यान, त्यांची सून चेंबूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल असल्याने ते तिला पाहण्यासाठी थांबले. त्यांनी पैशांनी भरलेली बॅग गाडीतच ठेवली होती, त्यावेळी चालक नितेशकुमार महंतो गाडीत उपस्थित होता.
संशय आला आणि आरोपी फरार
काही वेळानंतर डांगी यांच्या लक्षात आले की, पैशांची बॅग गाडीत आहे. त्यांनी चालकाला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद येत होता. संशय आल्याने त्यांनी तात्काळ त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या नितेशकुमारचा भाऊ राहुलकुमार महंतो यालाही फोन केला, पण त्याचाही फोन बंद होता.
दोघांचे फोन बंद असल्याने डांगी यांनी त्वरीत मोटारगाडीजवळ धाव घेतली. मात्र, चालक नितेशकुमार गाडी सोडून पळून गेला होता आणि गाडीतील पैशांची बॅग गायब झाली होती. डांगी यांनी तात्काळ गोवंडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
सहा दिवसांच्या शोधमोहिमेनंतर अटक
दोन्ही आरोपी मूळचे बिहारमधील एका खेड्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळताच, गोवंडी पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले. सलग सहा दिवस शोध मोहीम राबवल्यानंतर पोलिसांनी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील एका गावातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या रकमेपैकी 36 लाख रुपये हस्तगत केले असून, उर्वरित रकमेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.



