मुंबई

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंना ‘अजगर’ म्हणत बावनकुळेंचे प्रत्युत्तर; ‘ॲनाकोंडा’ वादातून भाजप-ठाकरे गटात खडाजंगी

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray : वरळी डोममधील ‘निर्धार’ मेळाव्यानंतर राज्यातील राजकारण तापले; बावनकुळेंकडून ‘विकृत राजकारण’ची टीका

मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी वरळी डोममध्ये झालेल्या ‘निर्धार’ मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा अप्रत्यक्षपणे ‘ॲनाकोंडा’ असा उल्लेख करत जोरदार टीका केली. या टीकेला भाजपने त्वरित आणि तेवढ्याच कठोर भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule Tweet यांनी थेट ट्विटरवर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘घरात बसलेले अजगर’ असा केला आहे.

बावनकुळेंचा ‘अजगर’ हल्ला

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत संतप्त शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले:

“इतरांना ॲनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं, कारण ते घरात बसलेले अजगर आहेत. जे फक्त पडून राहतात, आणि दुसऱ्यांच्या मेहनतीवर फूत्कार काढतात. या अजगरानं स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं, आपल्या सैनिकांना गिळलं, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वावादी विचारांना गिळलं. 25 वर्षे मुंबई गिळंकृत केली. तो अजगर आज इतरांवर दोष देतोय.”

‘वैफल्यग्रस्त झाले आहेत’

बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला त्यांची मानसिक निराशा असल्याचे कारण दिले. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ते वैफल्यग्रस्त झाले आहेत आणि त्यांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. त्यामुळेच ते ‘गरळ’ ओकत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

अमित शहा देशभरात फिरून संघटना उभी करतात, कलम 370 रद्द करून इतिहास रचतात, तर उद्धव ठाकरे घरात बसून फक्त मोदीजी आणि अमितभाईंवर टीका करण्याचा उद्योग करतात, असे बावनकुळे म्हणाले.

‘नीच स्तर गाठू शकत नाही’

उद्धव ठाकरे यांनी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे, पण आम्ही तो नीच स्तर गाठू शकत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचा पराभव होणार असल्याचे ठाऊक असल्याने ते ‘विवेकभ्रष्ट’ टीका करत आहेत, असे बावनकुळे यांनी म्हटले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला की, त्यांच्या या ‘विकृत राजकारणाला’ त्यांचे कार्यकर्ते कंटाळले आहेत आणि एक वेळ अशी येईल की, त्यांच्यासोबत कुणीही राहणार नाही.

vivek

Recent Posts