Ajit Pawar Death : अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका; राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर, बारामतीत शासकीय सुट्टी
•Devendra Fadnavis On Ajit Pawar Death : “मी एक दिलदार मित्र गमावला…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अत्यंत भावूक प्रतिक्रिया
बारामती | महाराष्ट्राच्या राजकारणातील एका पहाडी नेतृत्वाचा अंत झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यावर शोककळा पसरली असून, सरकारने अधिकृतपणे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, “अजितदादांच्या निधनावर विश्वास ठेवायला मन तयार नाही,” अशा शब्दांत आपल्या मनातील वेदनांना वाट करून दिली.
“दमदार आणि दिलदार मित्र हरपला”
अजित पवारांच्या जाण्याने वैयक्तिक आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले,”महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची आणि प्रश्नांची जाण असलेला हा लोकनेता होता. जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आस्था होती. वैयक्तिकरित्या मी आज माझा एक दमदार आणि दिलदार मित्र गमावला आहे. अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे लागतात.”
बारामतीकडे नेत्यांची धाव; सुप्रिया सुळे आणि पार्थ पवारांशी चर्चा
घटनेची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची कल्पना दिली आहे. “मी सकाळी सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्याशी संवाद साधला आहे. संपूर्ण पवार कुटुंब बारामतीत पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीनेच अंत्यसंस्कार आणि पुढील निर्णय घेतले जातील,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
प्रशासकीय निर्णय आणि श्रद्धांजली
3 दिवसांचा दुखवटा: संपूर्ण महाराष्ट्रात पुढील तीन दिवस शासकीय दुखवटा पाळला जाईल. सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
बारामती बंद: बारामतीमध्ये आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली असून, संपूर्ण शहर आणि तालुक्यात व्यवहार पूर्णपणे बंद आहेत.
संयुक्त भेट: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहेत.
संघर्षातून घडलेले नेतृत्व आता स्मृतीत…
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या संघर्षाचे कौतुक करताना सांगितले की, ते कोणत्याही परिस्थितीत न डगमगणारे व्यक्तिमत्व होते. “आम्ही अतिशय कठीण काळात सोबत काम केले आहे. महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचे योगदान अतुलनीय होते. हे नुकसान कधीही भरून न निघणारे आहे,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना आवर घातला.


