Champions Trophy 2025 : वरुण चक्रवर्तीचा ‘चक्रव्यूह’ न्यूझीलंडला भेदता आला नाही, भारत अ गटाचा बादशहा ठरला; किवींचा 44 धावांनी पराभव

Champions Trophy 2025 Latest Update : भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला आहे. यासह ते चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या गट अ मध्ये अव्वल स्थानावर आहे. जाणून घ्या उपांत्य फेरीत कोणत्या संघाचा सामना होणार आहे?
Champions Trophy 2025 :- भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या गट टप्प्यातील हा शेवटचा सामना होता. दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने प्रथम खेळताना 249 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये श्रेयस अय्यरच्या 79 धावांच्या खेळीचे महत्त्वपूर्ण योगदान होते.प्रत्युत्तरात न्यूझीलंडला लक्ष्यापेक्षा केवळ 21 धावा कमी करता आल्या. केन विल्यमसनने 81 धावांची खेळी खेळली, पण तो आपल्या संघाचा विजय निश्चित करू शकला नाही.
भारताची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिल स्वस्तात बाद झाली. विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा 300 वा एकदिवसीय सामना होता, ज्यामध्ये तो जबरदस्त टचमध्ये दिसत होता. पण ग्लेन फिलिप्सने असा जादुई झेल घेतला की मैदानातले सगळेच अवाक् झाले. विराटने 11 धावा केल्या.
पण संकटाच्या परिस्थितीत श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी टीम इंडियाची धुरा सांभाळली, ज्यांच्यामध्ये 98 धावांची भागीदारी झाली. अय्यरने 79 धावा केल्या, तर अक्षर पटेलने 42 धावांचे योगदान दिले. हार्दिक पांड्यानेही 45 धावांची खेळी करत भारताला 249 धावांपर्यंत मजल मारली.
भारताच्या विजयात सर्वात मोठा वाटा श्रेयस अय्यर आणि वरुण चक्रवर्ती यांचा होता. दुबईच्या संथ खेळपट्टीवर प्रथम श्रेयस अय्यरने 79 धावांची खेळी केली. तर गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीने 5 विकेट घेत किवींना खूप त्रास दिला.चक्रवर्तीचा हा चॅम्पियन्स ट्रॉफीतील पदार्पणाचा सामना होता, ज्यामध्ये त्याने विकेट घेऊन इतिहास रचला. चॅम्पियन्स पदार्पणाच्या सामन्यात 5 बळी घेणारा वरुण पहिला भारतीय गोलंदाज आहे.