
Maharashtra Weather Alert Update : अरबी समुद्रातून आलेल्या हवामान प्रणालीमुळे पावसाला जोर,रायगड, कोकण, पुणे, विदर्भात अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’
मुंबई | शनिवारी सायंकाळी मुंबईकरांना दमदार पावसाचा पहिला जोरदार अनुभव आला आणि रविवारी सकाळपर्यंत अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरूच राहिली. हवामान विभागाने सोमवारी मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकण विभागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. Maharashtra Weather Alerts Update
अरबी समुद्र ते ओडिशा किनाऱ्यापर्यंत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा हवामानात मोठा बदल घडवत असून, महाराष्ट्रात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, वांद्रे, अंधेरी, दादर, परळ, सांताक्रूझ परिसरात रविवारीही मेघगर्जनेसह पाऊस झाला. Mumbai Rain Update
कुलाबा वेधशाळेत सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत 6.6 मिमी आणि सांताक्रूझ वेधशाळेत 5.4 मिमी पावसाची नोंद झाली.
रायगड जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’!
हवामान विभागाने रायगडसह कोकणातील काही भागांत सोमवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांतही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातही गडगडाटी पावसाची शक्यता
भंडारा, नागपूर, वर्धा, गोंदिया, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यांत वाऱ्यांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.दरम्यान, नैऋत्य मोसमी वारे मुंबई, नांदेड, बीड, यवतमाळ, गडचिरोलीपर्यंत स्थिरावले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत ते विदर्भ, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि बिहारमध्ये पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


