Canada Firing News : कॅनडात भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; टोरंटो विद्यापीठातील 20 वर्षीय शिवांक अवस्थीचा करुण अंत

Canada Latest Firing News : विद्यापीठात भीतीचे वातावरण; वैयक्तिक वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय
ANI | कॅनडातील टोरंटो विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या शिवांक अवस्थी या 20 वर्षीय भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. 23 डिसेंबर रोजी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. शिवांकच्या हत्येनंतर टोरंटो विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नेमकी घटना काय?
टोरंटो पोलिसांना 23 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजून 34 मिनिटांच्या सुमारास गोळीबाराची माहिती मिळाली होती. पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा शिवांक अवस्थी हा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ही हत्या वैयक्तिक वादातून झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
एक अष्टपैलू विद्यार्थी गमावला
शिवांक अवस्थी हा टोरंटो विद्यापीठात ‘लाइफ सायन्स’ (Life Science) या विषयाच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. अभ्यासासोबतच तो विद्यापीठाच्या ‘चीअरलिडिंग टीम’चा देखील सक्रिय सदस्य होता. त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहिली असून, “एक हसतमुख आणि उत्साही मित्र गमावल्याची” भावना व्यक्त केली आहे.
भारतीय दूतावासाकडून मदतीचे आश्वासन
टोरंटोमधील भारतीय कॉन्सूलेट जनरलच्या अधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दूतावासाचे अधिकारी शिवांकच्या कुटुंबीयांच्या सतत संपर्कात असून, मृतदेह भारतात पाठवण्यासाठी आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी सर्वतोपरी मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.



