
Mumbai Latest Bomb Threat News : शुक्रवारी दुपारी नियंत्रण कक्षाला दूरध्वनी; टी-2 टर्मिनलची कसून तपासणी, संशयास्पद काहीही आढळले नाही.
मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने शुक्रवारी (25 जुलै) दुपारी सर्व सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला थेट दूरध्वनीवरून ही धमकी मिळाल्यानंतर विमानतळ प्रशासनाने तात्काळ पावले उचलली. टी-2 टर्मिनलची कसून तपासणी करण्यात आली, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. आता धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत. Mumbai Latest Bomb Threat News
दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक दूरध्वनी आला. या दूरध्वनीवर विमानतळाच्या टी-2 टर्मिनलमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी तात्काळ याची माहिती स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दिली. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (BDDS) पाचारण करण्यात आले आणि त्यांनी टर्मिनलची कसून तपासणी सुरू केली.
अनेक तास चाललेल्या या तपासणी मोहिमेदरम्यान, विमानतळावर किंवा विमानांमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. यामुळे सर्व यंत्रणांनी सुटकेचा निःश्वास टाकला. आता पोलीस ज्या क्रमांकावरून धमकीचा दूरध्वनी आला होता, त्या क्रमांकावरून संशयित आरोपीचा शोध घेत आहेत. या धमकीमागे नेमके काय कारण होते, याचाही तपास पोलीस करत आहेत.
गेल्या काही काळापासून मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या धमक्यांचे सत्र सुरू आहे. यापूर्वीही अनेकवेळा अशा धमक्या ईमेलद्वारे प्राप्त झाल्या आहेत, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांना वारंवार अलर्ट राहावे लागते. या नवीन घटनेमुळे पुन्हा एकदा विमानतळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.


