
Bollywood Latest News : 12 दिवसांच्या उपचारानंतर घरी परतले; घरीच पुढील उपचार सुरू राहणार; बॉबी देओल होता सोबत
मुंबई :- ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या 12 दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता उपचारांना प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, ते घरी परतले आहेत.
डॉक्टरांची माहिती
धर्मेंद्र यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीक समदानी यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. “त्यांच्यावर बऱ्याच काळापासून उपचार सुरू होते. त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, पण, त्यांच्यावर इथून पुढचे उपचार आता घरी सुरू राहतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
टीमचे निवेदन आणि आवाहन
धर्मेंद्र यांच्या टीमने एक निवेदन जाहीर करून चाहत्यांचे आभार मानले आहेत, तसेच अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
“धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि ते घरीच उपचार करतील. आम्ही माध्यमांना आणि चाहत्यांना विनंती करतो की, त्यांनी या काळात कोणत्याही प्रकारच्या अफवांपासून दूर राहावे आणि त्यांचा तसेच कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी आम्ही सर्वांच्या प्रेम, प्रार्थना आणि शुभेच्छांचे आभार मानतो.”
रुग्णालयातून डिस्चार्जवेळी धर्मेंद्र यांच्यासोबत त्यांचा मुलगा बॉबी देओल होता आणि तोच त्यांना ॲम्बुलन्समधून घरी घेऊन गेला. धर्मेंद्र रुग्णालयात असताना सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, आमिषा पटेल आणि रितेश देशमुख यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांची भेट घेतली होती.



