
Mumbai Police Arrested Ravi Pujari : 25 वर्षांनंतर फुटला पापाचा घडा; चित्रपटाच्या वादातून 50 लाखांच्या खंडणीसाठी रेमोच्या पत्नीला केले होते फोन; 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई | चित्रपटसृष्टी आणि अंडरवर्ल्डचे जुने कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले असून, मुंबई गुन्हे शाखेच्या Mumbai Crime Branch खंडणीविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. बॉलीवूडचे सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा तसेच त्यांची पत्नी लिझेल डिसूझा यांना धमकावल्याच्या प्रकरणात कुख्यात गँगस्टर रवी पुजारीला अधिकृतपणे अटक करण्यात आली आहे. तब्बल 25 वर्षे परदेशात फरार राहिल्यानंतर 2020 मध्ये भारतात आणलेल्या पुजारीला आता या जुन्या गुन्ह्यात न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
चित्रपटाचा आर्थिक वाद आणि गँगस्टरची एन्ट्री या संपूर्ण प्रकरणाची मुळे 2014 सालातील एका रखडलेल्या चित्रपट प्रकल्पात आहेत. रेमो डिसूझा आणि निर्माता सत्येंद्र त्यागी यांनी संयुक्तपणे ‘डेथ ऑफ अमर’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली होती. मात्र, हा चित्रपट सेन्सॉर बोर्डात अडकल्यामुळे प्रदर्शित होऊ शकला नाही. या गुंतवणुकीवरून रेमो आणि त्यागी यांच्यात आर्थिक वाद विकोपाला गेला होता. आपले पैसे वसूल करण्यासाठी आणि चित्रपटासाठी ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवण्यासाठी सत्येंद्र त्यागीने थेट रवी पुजारीची मदत घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
50 लाखांची खंडणी आणि सततचे फोन कॉल सत्येंद्र त्यागीच्या सांगण्यावरून रवी पुजारीने ऑगस्ट 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत रेमो डिसूझा आणि त्यांच्या पत्नीला अनेकदा धमक्यांचे फोन केले. या संभाषणादरम्यान पुजारीने त्यागीला एनओसी देण्यासह 50 लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली होती. या सततच्या त्रासामुळे लिझेल डिसूझा यांनी मार्च 2018 मध्ये आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती, ज्याचा तपास पुढे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
तपासाची चक्रे आणि पोलिसांचा दणका या प्रकरणात पोलिसांनी मार्च 2018 मध्येच चित्रपट निर्माता सत्येंद्र त्यागीला दिल्लीतून अटक केली होती. त्याच्या चौकशीतून त्याचा साथीदार कमलसिंह राजपूत उर्फ राजू हा देखील गजाआड झाला होता. मात्र, त्यावेळी रवी पुजारी फरार असल्याने त्याला या गुन्ह्यात अटक करता आली नव्हती. आता पुजारीच्या कोठडीत झालेल्या या अटकेमुळे जुन्या प्रकरणांचा सखोल तपास सुरू झाला आहे. 2017 मध्ये त्यागीनेही रेमोवर प्रतिआरोप करत गाझियाबादमध्ये तक्रार केली होती, मात्र अंडरवर्ल्डच्या माध्यमातून वसुलीचा प्रयत्न केल्याचे पुरावे समोर आल्याने आता तपासाची दिशा स्पष्ट झाली आहे.


