BMC Election Result Live : महापालिका निकाल लाईव्ह: मुंबईत महायुतीची आघाडी, तर ठाकरे बंधूंची जोरदार मुसंडी

•ठाण्यात शिंदेंचा बालेकिल्ला भक्कम
मुंबई :- महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या मतदानानंतर आता ईव्हीएमच्या फेऱ्यांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. सुरुवातीच्या कलानुसार मुंबईत महायुतीने मुसंडी मारली असली, तरी ठाकरे आणि मनसे युतीने अनेक वॉर्डमध्ये सत्ताधाऱ्यांना घाम फोडला आहे.
मुंबई (BMC) – चुरशीची लढत सुरू
मुंबईत सध्या २२७ पैकी ४६ जागांचे कल समोर आले आहेत. यामध्ये महायुतीने २३ जागांवर आपली पकड मजबूत केली आहे, ज्यात भाजप १६ आणि शिंदे गट ७ जागांवर आघाडीवर आहे. मात्र, ठाकरे बंधूंची युती देखील मागे नसून त्यांनी १३ जागांवर आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, वरळी आणि लालबाग-परळ या मराठी भाषिक पट्ट्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली आहे. काँग्रेसने ५ जागांवर, तर इतर स्थानिक आघाड्यांनी ५ जागांवर आघाडी मिळवली आहे.
ठाणे – शिंदेंचा बालेकिल्ला अभेद्य
ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सुरुवातीलाच मोठी आघाडी घेतली आहे. ठाण्यातील १३१ जागांपैकी अनेक प्रभागांत शिंदे गटाचे उमेदवार पुढे आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांचे बंधू प्रकाश शिंदे आणि राजेंद्र फाटक यांनी पहिल्या फेरीतच समाधानकारक आघाडी मिळवली आहे. ठाण्यात भाजपनेही काही जागांवर आघाडी घेतल्याने येथे महायुतीचे वर्चस्व अधिक ठळकपणे दिसून येत आहे.
पुणे आणि नाशिकमध्ये भाजपचा जोर
पुण्यात सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपने मोठी मुसंडी मारली असून, राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) सहकार्याने अनेक जागांवर आघाडी घेतली आहे. नाशिकमध्ये मात्र महायुती आणि ठाकरे गट यांच्यात प्रत्येक मतासाठी संघर्ष होताना दिसत आहे. तेथे मनसेचे उमेदवारही काही प्रभागांत अनपेक्षितरी्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
वसई-विरार आणि इतर महापालिका
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला महायुतीकडून कडवे आव्हान मिळत आहे. अहिल्यानगर आणि कोल्हापूरमध्ये काँग्रेसने अनपेक्षितरीत्या सुरुवातीच्या फेऱ्यांत आघाडी घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर नागपूर आणि संभाजीनगरमध्ये भाजप आणि एमआयएम यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळत आहे.



