मुंबई
Trending

Mumbai News : “मातृभाषेतून शिकलेली मुळे – सर्वोच्च न्यायालयाच्या शिखरावर रोवलेली उंच झेप!”

lawyer Bhushan Gawai : मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांचे स्पष्ट मत : “मराठी शाळेमुळे माझे पाय जमिनीवर राहिले”

मुंबई | राज्यभरात मातृभाषेतील शिक्षणाचा आवाज पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. केंद्र सरकारच्या हिंदी सक्ती धोरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या संतप्त प्रतिक्रिया आता विचारमंथनाच्या वळणावर येऊ लागल्या असताना, देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिलेलं ठाम मत या चर्चेला महत्त्वपूर्ण दिशा देणारं ठरत आहे.

गेल्या रविवारी गिरगाव येथील त्यांच्या जुन्या शाळेत झालेल्या सत्कार समारंभात बोलताना गवई म्हणाले, “मराठी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे आयुष्यभर मला दिशा मिळाली. मूल्यांची बीजे रुजली. आणि आजही माझे पाय जमिनीवर आहेत.”

शिरोडकर शाळेतील सत्कार सोहळ्यात गवई यांनी विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत साऱ्यांशी संवाद साधला. भाषणाची सुरुवात करताना थोडीशी संकोचाने “मराठीत बोलू का इंग्रजीत?” असं विचारत त्यांनी स्पष्टपणे मराठीच निवडली. “सध्या महाराष्ट्रात यावरच चर्चा सुरू आहे, मग मीही मराठीतच बोलतो,” असं म्हणत त्यांनी मनापासून भाषण दिलं.

आपल्या अनुभवाच्या आठवणी शेअर करताना त्यांनी सांगितलं, “शाळेत जाण्यासाठी माझ्या आईकडून रोज फक्त २० पैसे मिळायचे, त्याच पैशांत बसचं तिकीट काढून मी शाळेत जात असे.” हा साधेपणा आणि शिक्षणाची ओढ आज त्यांना देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेच्या शिखरावर घेऊन गेली आहे.

राज्यात मागील काही आठवड्यांत फडणवीस सरकारने घेतलेला हिंदी सक्तीचा निर्णय आणि त्यावरून उसळलेला वाद अजूनही शांत झालेला नाही. जनतेच्या विरोधामुळे सरकारने मागे घेतलेला निर्णय जरी काहीसा समाधानकारक वाटत असला तरी त्याचा राजकीय आणि सामाजिक पडसाद अद्याप कायम आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0