
BJP leaders allegedly made a Congress worker wear a saree in public : डोंबिवलीत भाजपची ‘जशास तसे’ कृती; काँग्रेस नेते मामा पगारे यांना भररस्त्यात नेसवला शालू
डोंबिवली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल साडी नेसवलेली प्रतिमा समाज माध्यमांवर प्रसारित केल्याने संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी डोंबिवलीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मामा उर्फ प्रकाश पगारे यांना भर रस्त्यात गाठून त्यांनाच नवाकोरा शालू नेसवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
काँग्रेस नेते मामा पगारे यांनी समाज माध्यमांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल साडी नेसवलेली प्रतिमा शेअर केली होती. या प्रतिमेसोबत त्यांनी ‘मी कशाला आरशात पाहू ग, मी माझ्या रूपाची खाण ग, मी कशाला बंधनात राहू ग’ हे गाणेही सामायिक केले होते. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.
या प्रकाराचा बदला घेण्यासाठी कल्याण जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, मंडल अध्यक्ष करण जाधव, पदाधिकारी संदीप माळी आणि दत्ता माळेकर यांनी पगारे यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. मामा पगारे रोज सकाळी डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावर असतात, अशी माहिती मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी पाच हजार रुपयांचा भरजरी शालू खरेदी केला.
भररस्त्यात साडी नेसवण्याचा प्रकार
मंगळवारी सकाळी भाजप कार्यकर्त्यांनी पगारे यांना मानपाडा रस्त्यावर गाठले. पगारे पांढऱ्याशुभ्र पेहरावात होते. त्यांना पाहताच भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचे हात पकडून त्यांना जबरदस्तीने शालू नेसविण्यास सुरुवात केली. ‘अरे, तुम्ही हे काय करता,’ असे म्हणत पगारे यांनी विरोध केला, पण कार्यकर्त्यांनी त्यांचे ऐकले नाही. एका कार्यकर्त्यांनी त्यांना गालगुच्चा घेत ‘असे परत करू नका,’ असा सल्ला देत तेथून निघून गेले.
या घटनेची पुष्टी करताना भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब म्हणाले, “आमच्या पंतप्रधान किंवा कोणत्याही नेत्याची कोणीही समाज माध्यमांत बदनामी केली, तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. म्हणूनच आम्ही मामा पगारे यांना भर रस्त्यात शालू नेसविला.”



