ठाणे

BJP Kirit Somaiya News : 2019 चा ‘तो’ अपमान विसरलो नाही! – किरीट सोमय्यांची भाजप नेत्यांवर जाहीर खदखद, ‘बांगलादेशीमुक्त मुंबई’ हेच सर्वात मोठे पद

BJP Kirit Somaiya News: “मला सभागृहातून बाहेर काढणाऱ्या त्या भाजप नेत्याला कधीही माफ करणार नाही.” – सोमय्यांचा अप्रत्यक्षपणे सुधीर मुनगंटीवारांवर निशाणा; “कोणत्याही पदाची गरज नाही, मी पक्षासाठी हजारो पटीने काम करतोय.”

मुंबई :- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज (9 डिसेंबर) पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या अपमानाचे दुःख जाहीरपणे व्यक्त केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांना अपमानित होऊन भाजपच्या पत्रकार परिषदेतून बाहेर काढले गेले, तो अपमान आपण विसरू शकत नाही.

2019 ची ती घटना

सोमय्या यांनी सांगितले की, “मी देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, 2019 ची घटना मी विसरू शकत नाही. पक्षासाठी मी त्याग, बलिदान दिले आहे.” पुढे ते म्हणाले की, भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी समझोता केला हे ठीक आहे, पण “मुद्दा असा आहे की, मला प्लॅटफॉर्मवरुन बाहेर काढलं, पार्टीच्या सभागृहातून बाहेर काढलं हे केवळ उद्धव ठाकरेच्या जिद्दमुळे. ह्याला मी कधीही त्या भाजप नेत्याला माफ करू शकत नाही.” या विधानातून त्यांनी अप्रत्यक्षपणे तत्कालीन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘पद’ आणि ‘कार्यकर्ता’

बनावट जन्म प्रमाणपत्रासंदर्भात मुलुंड कुर्ला तहसीलदार यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. “मला आता कोणत्याही पदाची गरज नाही,” असे सांगून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मी सर्वांपेक्षा जास्त हजारो पटीने मी काम करत आहे, कार्यकर्ता माझ्यासोबत आहे हे माझ्यासाठी सर्वात मोठे पद आहे.”

लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याच्या विषयाला त्यांनी महत्त्व दिले नाही.”मुंबईला बांगलादेशीमुक्त करण्यासाठी हा भाजपचा कार्यकर्ता पुढे येत आहे, बांगलादेशी मला बघितलं की घाबरत आहेत, हे माझ्यासाठी मोठं पद आहे,” असे सांगून त्यांनी आपल्या सध्याच्या कार्यालाच सर्वोच्च स्थान दिले. तसेच, “मुख्यमंत्री माझी काळजी घेत असतात, देशाच्या गृहमंत्र्यांनी मला सुरक्षा दिली आहे,” असेही त्यांनी शेवटी नमूद केले.

vivek

Recent Posts