मुंबई

पूरग्रस्तांच्या मदतीवरून भाजपानी ठाकरे सेनेची ‘दसरा मेळावा’ वरुन कोंडी!

“ठाकरे गटाने मेळावा रद्द करून वाचलेला निधी शेतकऱ्यांना द्यावा” – केशव उपाध्ये यांची थेट मागणी ; चिखलाचे साम्राज्य असूनही ठाकरे गट शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यावर ठाम; दोन्ही सेनांकडून तयारीला वेग

मुंबई :- अतिवृष्टी आणि पूरस्थितीवरून महायुती सरकारला सातत्याने घेरणाऱ्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आता भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. भाजप नेते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान देत, मुंबईतील चार दिवसांवर आलेला दसरा मेळावा रद्द करून, त्यातून वाचणारा कोट्यवधी रुपयांचा निधी पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून द्यावा, अशी मागणी केली आहे.

नेमके काय म्हणाले केशव उपाध्ये?

उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळावा
रद्द करून तो खर्च पूरग्रस्ताना द्यावा !

मराठवाड्यातील पूरपरिस्थिती भयंकर आहे. लोकांच सगळं उध्वस्त झालं आहे. त्याबद्दल उध्दव ठाकरे यांनी पाच जिल्ह्यात तब्बल तीन तासांचा दौरा करून दुःख, वेदना, व्यथा व्यक्त केली आहे. त्यांच्या या भावना पाहून सगळेच अस्वस्थ झाले आहेत.

उद्धवराव,आता वेळ आहे कृती करायची… मुख्यमंत्री असताना तर कधी कृती न करता घरात बसून राहिलात, आता त्याचे प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे. दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्ताना दिला पाहिजे. तर त्यांच्या व्यथा आणि वेदनांवर संवेदना व्यक्त करायला अर्थ असेल.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना या दसरा मेळाव्यात विचांराचे सोने लुटले जायचे, आता तिथे येऊन मिंधे, गद्दार, माझा पक्ष चोरला एवढीच टेप वाजवणार, नुसताच थयथयाट अन् कांगावा… त्यासाठी बिचाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भुर्दंड पाडून लाखोंचा खर्च कशाला करायचा? ते रडगाणं तर सामनातून चालूच असतं की!!

काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत, पूरग्रस्तांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी केली होती. तसेच, सरकारने दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला होता.

भाजपकडून कोंडीचा प्रयत्न

ठाकरे यांच्या या भूमिकेवर प्रतिहल्ला चढवत भाजपने त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दसरा मेळाव्याच्या भव्य आयोजनावर होणारा खर्च वाचवून तो निधी शेतकऱ्यांना देण्याची मागणी करत भाजपने, ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

मुसळधार पाऊस, तरीही शिवतीर्थावरच मेळावा!

दरम्यान, राज्यात शिवसेना फुटीनंतर गेल्या तीन वर्षांपासून दोन्ही गटांकडून दोन वेगवेगळे दसरा मेळावे आयोजित केले जातात. यंदाच्या मेळाव्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने यंदाही शिवाजी पार्क (शिवतीर्थ) या ऐतिहासिक मैदानावरच मेळावा घेण्याचा निर्धार केला आहे.

मुंबईत पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, शिवाजी पार्कच्या मैदानावर सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. असे असूनही, ठाकरे गटाने मेळावा शिवतीर्थावरच घेण्यावर ठाम राहून तयारीला सुरुवात केली आहे. काल सेना भवन येथे मेळाव्याच्या नियोजनाची सविस्तर बैठकही पार पडली. त्यामुळे, भाजपच्या मागणीनंतरही ठाकरे गट आपल्या दसरा मेळाव्याच्या आयोजनात बदल करतो का, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0