
Nashik Latest News : वरिष्ठांना मोठा धक्का; भाजपला हरवण्यासाठी स्थानिक नेत्यांनी घेतला धाडसी निर्णय; 11 नगर परिषदा-पंचायतीसाठी एकवटले
नाशिक :- राज्याच्या राजकारणात मनसेचा (MNS) महाविकास आघाडीत (MVA) समावेश होणार की नाही, याबद्दल अजूनही राजकीय पातळीवर साशंकता कायम असताना, नाशिकमध्ये मात्र स्थानिक नेत्यांनी एक ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या महायुतीविरुद्ध एकत्रितपणे लढण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. Nashik Latest News
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व आगामी निवडणुका एकत्रितपणे लढण्याची घोषणा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोमवारी केली, ज्यामुळे त्यांनी राज्याच्या वरिष्ठ नेत्यांना एकप्रकारे मोठा धक्का दिला आहे.
युतीचा निर्णय आणि कारण
काँग्रेसच्या काही नेत्यांनी मनसेच्या परप्रांतीय विरोधी आणि हिंदुत्ववादी भूमिकेमुळे आघाडीत त्यांच्या सहभागावर साशंकता व्यक्त केली होती. मात्र, आघाडीतील प्रमुख पक्षांनी स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्यानंतर नाशिकमध्ये मनसेलाही सोबत घेण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यात पहिल्यांदाच असा निर्णय झाला आहे.
संयुक्त पत्रकार परिषदेत स्थानिक नेत्यांनी भाजपला हद्दपार करणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले.
“महाविकास आघाडीत मनसेच्या समावेशाबद्दल वरिष्ठ नेते ठरवतील. परंतु, स्थानिक पातळीवर नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर आम्ही एकत्रित आल्याचा दावा संबंधितांनी केला.”
कोणत्या निवडणुका लढवणार
नाशिक जिल्ह्यातील 11 नगर परिषदा आणि नगर पंंचायतींच्या निवडणुका होत आहेत, ज्यात भगूर, मनमाड, नांदगाव, सटाणा, सिन्नर, येवला, चांदवड, इगतपुरी, ओझर, पिंपळगाव बसवंत आणि त्र्यंबकेश्वर यांचा समावेश आहे. स्थानिक नेत्यांनी या नगर परिषद, नगर पंंचायतींसह जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणूक देखील एकत्रित लढल्या जातील, असे सूचित केले आहे.
संयुक्त पत्रकार परिषदेत उपस्थित प्रमुख नेते: मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, शिवसेना (ठाकरे गट) माजी आमदार वसंत गिते, राष्ट्रवादी (शरद पवार गट) शहराध्यक्ष गजानन शेलार, माकपचे डॉ. डी. एल. कराड, काँग्रेसचे राहुल दिेवे आणि भाकपचे राजू देसले आदींनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
प्रमुख नेत्यांकडून निर्णय घेण्यात होत असलेल्या कालापव्ययादरम्यान नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम धाडसी निर्णय घेत सर्वांना एकप्रकारे धक्का दिला आहे.


