मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा ‘धक्का’; प्रभाग 211 च्या उमेदवाराने परस्पर अर्ज घेतला मागे! ठाकरे-पवार युतीत बिघाडीची चिन्हे

• प्रभाग 140 मध्येही पेच; जागा पवारांना सुटूनही ठाकरेंनी दिला एबी फॉर्म; जागावाटपाचा घोळ चव्हाट्यावर!
मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. महाविकास आघाडीचे जागावाटप झालेले असतानाच, प्रभाग क्रमांक 211 मधील शरद पवार गटाच्या उमेदवाराने पक्षाला अंधारात ठेवून माघार घेतल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, प्रभाग 140 मध्ये शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी (SP) आमनेसामने आल्याने युतीच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सुफियान अन्सारींचा ‘परस्पर’ माघार; युतीचा घात?
प्रभाग 211 मधून शरद पवार यांच्या पक्षाने सुफियान अन्सारी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, आज त्यांनी वरिष्ठ नेत्यांशी कोणतीही चर्चा न करता आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.या प्रभागात आता काँग्रेसचे उमेदवार वकार खान (आमदार रईस शेख यांचे स्वीय सहाय्यक) विरुद्ध समाजवादी पक्ष अशी लढत होणार आहे.
महायुतीला फायदा नाही: विशेष म्हणजे, या वॉर्डात भाजपने उमेदवार दिला होता, परंतु छाननी प्रक्रियेत भाजपचा अर्ज बाद झाला होता. आता पवारांच्या उमेदवाराने माघार घेतल्याने ठाकरे-मनसे-पवार युतीने मतदानापूर्वीच ही जागा गमावली आहे.
प्रभाग 140 मध्ये ठाकरेंचे आव्हान; मैत्रीपूर्ण की मतभेद?
जागावाटपात प्रभाग १४० हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटला असून तिथे संजय कांबळे हे अधिकृत उमेदवार आहेत. असे असतानाही शिवसेना ठाकरे गटाने येथे सिद्धार्थ उस्तूरे यांना ‘एबी फॉर्म’ दिला आहे. छाननीमध्ये हा अर्ज वैध ठरल्याने आता एकाच युतीचे दोन उमेदवार आमनेसामने आले आहेत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला असून युतीतील ‘बिघाडी’ आता चव्हाट्यावर आली आहे.
राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मोजक्याच जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, एका उमेदवाराची माघार आणि दुसऱ्या जागेवरील मित्रपक्षाचे आव्हान यामुळे मुंबईत आता राष्ट्रवादीचे केवळ ९ उमेदवार रिंगणात उरले आहेत. यामुळे ठाकरे बंधू आणि शरद पवार यांच्या आघाडीत जागावाटपाचे गणित कोलमडल्याचे दिसून येत आहे.



