Bhiwandi Crime News : भिवंडीत मोटार पंप आणि बॅटरीची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक
•भिवंडी पोलिसांच्या क्राइम ब्रांच ची कामगिरी ; तब्बल 75 पंपाचे मोटर चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी केले जेरबंद, दोन एक्साइड कंपनीच्या बॅटरी चोरट्यांकडून हस्तगत
भिवंडी :- भिवंडी शहरामध्ये मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना सातत्याने वाढत असताना पोलिसांकडून खबरदारी म्हणून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याकरिता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. भिवंडी पोलिसांच्या क्राइम ब्रांचने म्हणजेच गुन्हे शाखा घटक -2 दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून तब्बल 75 इलेक्ट्रॉनिक मोटार आणि दोन एक्साइड कंपनीच्या बॅटऱ्या हस्तगत केले आहे. यापूर्वी नारपोली, निजामपुरा आणि कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारपोली पोलीस ठाण्यात भादवि कलम 379 या गुन्ह्याचा गुन्हे शाखा घटक-2, भिवंडी येथील अधिकारी अंमलदार हे समांतर तपास करीत असताना पोलीस शिपाई उमेश ठाकूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्ह्यातील संशयित आरोपी हे भिवंडी परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांचे चौकशी दरम्यान दोघांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. दुर्गेश उर्फ लाला श्रीराम निशाद (22 वय, रा. खोपोली पोलीस ठाण्याजवळ खोपोली), महाजन रामसमुद यादव (38 वय,रा. शिळफाटा खोपोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 3 लाख 36 हजार 489 रुपये किंमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये एकूण 75 इलेक्ट्रॉनिक मोटर, दोन एक्साइड कंपनीच्या बॅटऱ्या, ॲल्युमिनियम स्क्रॅप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे ठाणे शहर, शेखर बागडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शोध-1, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक -2 भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, पोलीस उप निरीक्षक रविंद्र बी. पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी, पोलीस हवालदार यादव,वामन भोईर, जाधव, पोलीस शिपाई उमेश ठाकुर, रविंद्र साळुंखे.