Bhiwandi Crime News : भिवंडीत 2.17 लाखांची एम.डी.(मेफेड्रॉन) क्रिस्टल पावडर अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक
•भिवंडी येथे 66 ग्रॅम वजनाचे 2.17 लाखांचा एम.डी क्रिस्टल पावडर ड्रग्ज जप्त करण्यात आला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे.
भिवंडी :- विधानसभेच्या निवडणुकीत कुठेही अनुचित घटना घडू नये म्हणून राज्यभरातील पोलीस सतर्क असतानाच भिवंडी येथे एमडी क्रिस्टल पावडर ड्रग्जची विक्रीसाठी आलेल्या एकाला भिवंडी पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक-2 पोलिसांच्या विशेष पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. उमरान इद्रीस खान,( 25 वय, रा.कौसा, मुंब्रा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून असलेले 66 ग्रॅम वजनाची एम.डी. (मेफेड्रॉन) क्रिस्टल पावडर हा अंमली पदार्थ, व्हिवो कंपनीचा मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 17 हजार 250 रूपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.अंमली पदार्थ विक्रीकरिता बेकायदेशीररित्या जवळ बाळगला असल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-2 येथील पोलीस पथकात मिळालेल्या माहितीनुसार नाशिक कडून ठाण्याकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर मानकोली येथे एक व्यक्ती अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून उमरान खान याला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 66 ग्रॅम वजनाचा एमडी क्रिस्टल पावडर हा अंमली पदार्थ आढळून आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा अंतर्गत कलम 8(क),22(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपीचा पुढील तपास गुन्हे शाखा कक्षाचे-2,सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार हे करत आहे.