भिवंडी: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! 1.70 लाखांची लाच स्वीकारताना अंबाडीचा ग्रामपंचायत सदस्य गजाआड

Bhiwandi ACB Trap News : बिल्डिंगची घरपट्टी आकारण्यासाठी आणि तक्रार मागे घेण्यासाठी मागितली होती लाच; एसीबीने रचला यशस्वी सापळा
भिवंडी | भिवंडी तालुक्यातील अंबाडी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये Bhiwandi Ambanadi Bribe Case भ्रष्टाचाराचा एक मोठा प्रकार समोर आला आहे. इमारतीची घरपट्टी आणि पाणीपट्टी आकारण्यासाठी, तसेच अनधिकृत बांधकामाबाबतची तक्रार मागे घेण्याच्या बदल्यात 1 लाख 70 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या स्वप्नील सीताराम पाटील या ग्रामपंचायत सदस्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. Maharashtra ACB Latest News
काय आहे नेमकं प्रकरण?
या प्रकरणातील तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी अंबाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे क्र. 112/2 मध्ये सर्व कायदेशीर परवानग्या घेऊन तळमजला अधिक तीन मजल्यांची इमारत बांधली आहे. या इमारतीची सीसी (CC) आणि ओसी (OC) देखील त्यांना प्राप्त झाली आहे. तक्रारदार यांनी 27 ऑक्टोबर 2025 रोजी या इमारतीची घरपट्टी आणि पाणीपट्टी आकारण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता.
तक्रारीचा धाक दाखवून लाचेची मागणी
ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये स्वप्नील पाटील आणि इतर सदस्यांनी तक्रारदाराच्या अर्जाला विरोध केला. सदर इमारत अनधिकृत असल्याचे सांगत त्यांनी तहसीलदार यांच्या नावे कारवाईचा अर्जही केला होता. या अर्जाचा फोटो तक्रारदाराला व्हॉट्सॲपवर पाठवून त्याला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अखेर 18 जानेवारी 2026 रोजी स्वप्नील पाटील याने तक्रारदाराकडे तडजोडीचा प्रस्ताव ठेवला. इमारतीची घरपट्टी सुरू करून देणे आणि तहसीलदारांकडे केलेला तक्रारीचा अर्ज मागे घेणे, या बदल्यात 1 लाख 70 हजार रुपयांची मागणी केली.
एसीबीचा सापळा आणि अटक
तक्रारदाराने याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. 17 फेब्रुवारी रोजी एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता, लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, 18 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी च्या सुमारास सापळा रचण्यात आला. स्वप्नील पाटील याने 1 लाख 70 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.
कायदेशीर कारवाई
याप्रकरणी गणेशपुरी पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे आणि भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.



