Bhaskar Jadhav vs Bharat Gogawale : ‘ॐ फट स्वाहा!’ – विरोधकांची गोगावले यांच्यावर विधानभवनात मंतरलेली टीका

•ठाकरे गटाचा विधानभवनाच्या पायऱ्यांवर ‘अघोरी’ अंदाज, गोगावले यांची खिल्ली उडवली
मुंबई | राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या टीकास्त्रांमध्ये आता मंत्र-मंत्रयंत्रांचाही शिरकाव झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असलेल्या विरोधकांनी आज शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर उपरोधिक शैलीत निशाणा साधला.
भरत गोगावले विधानभवनात जात असताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी ‘ॐ फट स्वाहा!’ अशी घोषणा देत, त्यांच्यावर टोला लगावला. त्याचवेळी आमदार आदित्य ठाकरे यांनीही गोगावले यांची नकळत नक्कल करत वातावरण अधिक गुदगुलीत केले.


मात्र, यामागे एक गंभीर पार्श्वभूमाही आहे. ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी गोगावले यांच्यावर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ‘अघोरी पूजा’ केल्याचा थेट आरोप केला होता. “गोगावले यांनी उज्जैनच्या बागलामुखी मंदिरात ११ पुजाऱ्यांसोबत पूजा करून नंतर स्वतःच्या घरी विशेष पूजा घातली,” असा गंभीर आरोप मोरे यांनी केला.
“15 लाख रुपये खर्चून एका पूजेसाठी मांत्रिक बाहेर राज्यातून बोलावले गेले. ‘ॐ फट स्वाहा’ उच्चारणाऱ्या मांत्रिकांचा ससेमिरा महाराष्ट्रातील नेत्यांमागे लागलेला दिसतो,” असा गौप्यस्फोट करत मोरे यांनी भाजप-शिंदे गटावर निशाणा साधला.
अनिल परब यांनीही रायगडमध्ये सुरु असलेल्या ‘अघोरी’ कृतींवरून गोगावले यांच्यावर टीकास्त्र सोडले. “इतकंच काय, त्यांनी लाडक्या बहीणींच्या सुरक्षेसाठी ‘लिंबू-मिरची’ पर्यंत विधानभवनात आणली होती,” असा उपरोधिक टोमणाही परब यांनी लगावला.



