Bhagyashree Atram In Sharad Pawar Gat : मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम या शरद पवार गटात प्रवेश
•Bhagyashree Atram Joins Hand With Sharad Pawar अजित पवार गटाला धक्का, मुलगी राष्ट्रवादी शरद पवार गटात तर वडील राष्ट्रवादी अजित पवार गटात
गडचिरोली :- अहेरी, गडचिरोली मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या घरात अखेर फूट पडली आहे. आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम – हलगेकर यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला. मुलगी शरद पवार यांच्या गटात तर वडील अजित पवार यांच्या गटात अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. तसेच भाषणाच्या दरम्यान वडील धर्मरावबाबा आत्राम यांच्यावरही मुलगी भाग्यश्री यांनी इशारा दिला आहे.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम या शरद पवार गटात प्रवेश करत असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून येत होत्या. मात्र, त्याला धर्मरावबाबा आत्राम यांनी विरोध केला होता. मी घर फोडून बाहेर पडले नाही तर घर फोडून अजित पवार बाहेर पडले असल्याचे भाग्यश्री यांनी म्हटले आहे. आधी अजित पवार यांनी ते कबूल करावे, अशा शब्दात भाग्यश्री आत्राम यांनी अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय हा माझा आहे. शरद पवारांनी आमचे घर फोडलेले नाही. मी पक्षप्रवेशासाठी तीन वेळा त्यांची भेट घेतली असल्याचे देखील भाग्यश्री आत्राम यांनी म्हटले आहे.
माझ्या वडिलांकडे दुधारी तलवार असेल आणि त्याचा वापर ते करणार असेल तर मला देखील दहा हात आहेत हे लक्षात ठेवा. आगामी काळात नवरात्र आहे. त्यामुळे आगामी काळात मला चंडी आणि दुर्गा होण्याची संधी देऊ नका, अशा शब्दात त्यांनी आत्राम यांना सुनावले आहे. मी जेवढी शांत आहे, तेवढी मला शांतच राहू द्या. असे देखील त्या म्हणाल्या. धर्मरावबाबा शेर असतील तर त्यांची मुलगी देखील शेरनी आहे. आणि शेरनी जास्त घातक असते, हे लक्षात ठेवा, असे देखील त्यांनी सुनावले. माझ्या कार्यकर्त्यांना कोणी धमकी दिली, हात लावला तर ते हात तोडल्याशिवाय मी राहणार नाही, असा गंभीर इशारा देखील त्यांनी धर्मरावबाबा आत्राम यांना दिला आहे.