मुंबईठाणे
Trending

Mumbai Political Update : मुंबईच्या राजकारणात ‘पॉवर प्ले’! – राज-उद्धव भेटीनंतर ‘युती’ची घोषणा अवघ्या 48 तासांवर; अनिल परब, बाळा नांदगावकर यांचा मोठा गौप्यस्फोट

Mumbai Political Latest News : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला जोरदार प्रत्युत्तर; ‘युती’ची तारीख लवकरच ठरणार; काँग्रेससोबतच्या आघाडीवरही ठाकरे गट सावध

मुंबई :- मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून ज्या क्षणाची महाराष्ट्राचे राजकारण वाट पाहत होते, तो क्षण आता अगदी जवळ येऊन ठेपला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षांच्या संभाव्य युतीची घोषणा आता केवळ एक ते दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे, असा मोठा दावा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.

शिवसेना (ठाकरे) गटाचे आमदार अनिल परब आणि खासदार संजय राऊत यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेऊन युतीवर निर्णायक चर्चा केली. भेटीनंतर बोलताना अनिल परब यांनी युतीबाबत अत्यंत सकारात्मक संकेत दिले.
“युतीची अधिकृत घोषणा केव्हा करायची याचा निर्णय दोन्ही पक्षांचे नेते मिळून ठरवतील आणि त्याची तारीख लवकरच कळवली जाईल,” असे परब यांनी स्पष्ट केले.

हिंदुत्त्वावरून भाजपला आव्हान

बाळा नांदगावकर यांनी यावेळी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे असोत किंवा त्यांचे कुटुंबीय, त्यांना कोणीही हिंदुत्त्व शिकवण्याची गरज नाही. बाळासाहेबांचे हिंदुत्त्वासाठी निलंबन झाले होते आणि त्यांनीच हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर निवडणूक होऊ शकते हे दाखवून दिले, अशा शब्दांत त्यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले.

काँग्रेस आणि आघाडीवर सावध भूमिका

मुंबई महापालिकेत काँग्रेसला सोबत घेण्याबाबत विचारले असता, अनिल परब यांनी सावध भूमिका घेतली. “काँग्रेसच्या बाबतीत मी आत्ता आपल्याला काहीच सांगू इच्छित नाही,” असे ते म्हणाले. मात्र, ‘महाविकास आघाडी एकत्र राहावी’ यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न राहील, अशी भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.एकंदरीत, या भेटी आणि त्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिलेले संकेत पाहता, युतीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असून, यामुळे आगामी मुंबई आणि राज्यातील राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0