मुंबई
Trending

Thackeray Vs Fadnavis : राजकीय रणधुमाळी! ‘रुदाली’ टीकेवरून फडणवीस-ठाकरे आमनेसामने; आरोपांच्या फैरींनी महाराष्ट्रात राजकीय धुरळा!

Maharashtra Politics News : ठाकरेंचा पलटवार: “मूळ भाजप मेला, उर बडवायला इतर पक्षांतून ‘रुदाली’ आयात!”

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला ‘रुदाली’ची उपमा दिल्यानंतर, उद्धव ठाकरेंनी आज भाजपवरच ‘मृत्यू’चा आरोप करत जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. Thackeray Vs Fadnavis शनिवारी वरळी डोम येथे ‘मराठी भाषा विजयी मेळावा’ पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली होती. याच टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी, “मला सांगण्यात आले होते की, विजयी मेळावा होणार आहे. पण त्या ठिकाणी तर रुदालीचे भाषण झाले. मराठीबद्दल एक शब्दही न बोलता आमचे सरकार गेले, आमचे सरकार पाडले, आम्हाला सत्ता द्या, निवडून द्या असा प्रकार तिथे सुरू होता,” अशा शब्दांत टोला लगावला होता.

‘मूळ भाजपला यांनी मारले’ – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री फडणवीसांच्या या टीकेला आज विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी अत्यंत जहाल प्रत्युत्तर दिले. “मी त्यांची मानसिकता समजू शकतो. कारण मूळ भाजप मेलेला आहे, त्याचा खून या लोकांनी केला आहे. ‘रुदाली’ हाही हिंदी शब्द आहे. त्यामुळे त्यांनी उर बडवायला आमच्या पक्षातून, काँग्रेसमधून, राष्ट्रवादीतून आणि देशभरातल्या पक्षांमधून ‘उरबडवे’ घेतले आहेत. कारण मूळ भाजप मेला आहे. या लोकांनी भाजपला मारून टाकलंय,” अशा बोचऱ्या शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर थेट हल्ला केला.

ठाकरे पुढे म्हणाले, “दुःख व्यक्त करण्यासाठी उर बडवायलाही यांच्याकडे मूळ माणसं नाहीत. त्यांना ती माणसंही इतर पक्षांतून घ्यावी लागत आहेत. मी फडणवीसांची प्रतिक्रिया समजू शकतो, पण मराठी माणसाचे आनंदाचे क्षण ज्यांना ‘रुदाली’ वाटत असतील, ती अतिशय विकृत आणि हीणकस वृत्तीची माणसं आहेत.”

‘मराठीचे मारेकरी’ आणि दहशतवादाची तुलना

याशिवाय, मराठीच्या आग्रहासंदर्भात काही भाजप नेत्यांकडून पहलगाममधील दहशतवाद्यांशी तुलना झाल्याच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केले. “हे महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत. जो मराठी माणूस न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करतो, त्याची तुलना जे कुणी भाजपवाले पहलगामच्या दहशतवाद्यांशी करत असतील, तर ते मराठीचे मारेकरी आहेत. मग पहलगामचे दहशतवादी भाजपमध्ये गेले का? हे त्यांनी सांगावे. ते गेले कुठे? ज्यांनी आमच्यावर आरोप केला, त्यांच्या घरात राहत आहेत का? लाज वाटली पाहिजे. एकतर तुम्ही हिंदूंनाही वाचवू शकत नाही. वर मराठी माणसावर अन्याय करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेता. असे कर्मदरिद्री लोक महाराष्ट्रात राज्यकर्ते आहेत, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे,” असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0