महाराष्ट्रठाणेमुंबई
Trending

शिक्षक संघटनांचा एल्गार! – ‘वेतन कपात करा, पण माघार नाही’; 5 डिसेंबरला 25 हजार शाळा बंद राहणारच

Teacher Strike On 5 December : संचमान्यता, समायोजन आणि टीईटीच्या निर्णयाविरोधात आंदोलन; संघटनांची ठाम भूमिका, ‘एक दिवसाच्या कपातीने फरक पडणार नाही’

मुंबई :- शिक्षण विभागाने एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेऊनही राज्यातील शिक्षक संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत येत्या 5 डिसेंबर रोजी राज्यभरातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित अशा जवळपास 25 हजार शाळा बंद ठेवण्याचा ठाम निर्धार शिक्षक संघटनांनी व्यक्त केला आहे.

वेतन कपातीला जुमानले नाही

विविध मागण्यांसाठी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ‘शाळा बंद’ आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्यांचे वेतन कपात करण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला. मात्र, या निर्णयामुळे शिक्षक संघटनांनी अधिक तीव्र भूमिका घेतली आहे.
अनिल बोरनारे (मुंबई मराठी अध्यापक संघ): “शिक्षकांच्या समायोजनामुळे नववी आणि दहावीच्या जवळपास 18 हजार शाळा बंद पडणार आहेत. विद्यार्थ्यांचे आयुष्यही उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे एक दिवसाचे काय, महिनाभराचे वेतन कपात केले तरी चालेल, पण आता माघार नाही, आंदोलन होणारच.”

जालिंदर सरोदे (शिक्षक सेना राज्य कार्याध्यक्ष): “संचमान्यतेमुळे ग्रामीण भागासह राज्यातील 25 हजार शाळा बंद होणार आहेत. सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करता 5 डिसेंबरला राज्यभरात शाळा बंद ठेवणार.”

‘गळचेपी’वर संताप

मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे मुख्य नेते डॉ. विशाल कडणे यांनी सरकारकडून होणाऱ्या आंदोलनाच्या गळचेपीवर संताप व्यक्त केला. “शिक्षकांचे आयुष्य पणाला लागलेले असताना अशा प्रकारे आंदोलन दडपण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी शिक्षक मागे हटणार नाहीत. वेतन कपात केल्यास त्याचे पडसाद महानगरपालिका निवडणुकीमध्ये दिसतील,” असा इशारा त्यांनी दिला.
महामुंबई शिक्षक संस्था संघटनेचे अध्यक्ष सदानंद रावराणे यांनीही या आंदोलनाला संस्थाचालक संघटनेमार्फत पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, एक दिवसाच्या वेतनाने शिक्षकांच्या हक्कावर वरवंटा फिरवला जाणार असल्याने ते माघार घेणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0