Bata Store Fire Chembur : चेंबूरमधील बाटाच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

•सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत शोरुममधील सर्व सामान जळून खाक, जीवितहानी नाही
मुंबई :- चेंबूर येथील मल्हार हॉटेलजवळ असलेल्या शीव आशिष इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या बाटाच्या शोरूमला सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत दुकानातील चपला, बूट आणि इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे ती तळघरापर्यंत पसरली होती. अग्निशमन दलाने या आगीला ‘भीषण’ (वर्दी क्रमांक 1) घोषित केले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. आगीमुळे शोरूममधील विद्युत यंत्रणा, वायरिंग, चप्पल-बूटांचे बॉक्स आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.
आगीच्या कारणांचा अद्याप शोध सुरू असून, सध्या घटनास्थळी ‘कुलिंग ऑपरेशन’ सुरू आहे. अग्निशमन दलासोबतच अदानी इलेक्ट्रिसिटी, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.


