
Santosh Bangar : “एकनाथ शिंदे आगे बढो”ची मतदान केंद्रात घोषणाबाजी भोवली; मुख्यमंत्र्यांनीही सुनावले कठोर शब्द, कायद्याचे उल्लंघन केल्याने कारवाई
हिंगोली :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघाचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात Hingoli Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका काय घडला प्रकार?
हिंगोली शहरातील मंगळवारी बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक ३ येथे संतोष बांगर मतदानासाठी गेले होते. यावेळी त्यांनी खालील नियमबाह्य कृती केल्या:
1.मतदाराला निर्देश : त्यांनी एका महिला मतदाराला ईव्हीएमवर कोणते बटण दाबायचे याबाबत सूचना केल्या.
2.घोषणाबाजी : मतदान केंद्रातच त्यांनी “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो” आणि “एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ हैं” अशी घोषणाबाजी केली.
3.मोबाइल वापर : मतदान केंद्रात मोबाइल फोनचा देखील वापर केला.
मतदान केंद्रात घोषणाबाजी करणे, फोन वापरणे आणि मतदाराला मतदानाचे निर्देश देणे हे सर्वच लोकशाहीच्या गोपनीयतेचा भंग करणारे आणि आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन मानले जाते.
मुख्यमंत्र्यांची कठोर प्रतिक्रिया
या व्हिडिओनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संतोष बांगर यांना कठोर शब्दांत फटकारले होते.”किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे. निवडणुकीत आपण कसं वागतोय, आपण कोणता संदेश देतोय याचा विचार केला पाहिजे,” असे म्हणत फडणवीस यांनी त्यांना सुनावले होते.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चौकशीचे निर्देश दिले होते.
गोपनीयतेचा भंग झाल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती देण्यात आली होती. त्यानुसार, तपासानंतर आता संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.


