Baramati Bribe News : लाचलुचपत प्रतिबंध विभागाची मोठी कारवाई नगरपरिषदेच्या नगररचनाकाराला लाच प्रकरणी ताब्यात!

•Major action by the Anti-Corruption Department in Baramati बारामती नगरपरिषदेच्या नगर रचनाकार विकास ढेकळे यांना एक लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
बारामती :- बारामती नगर परिषदेत कार्यरत असलेल्या नगर रचनाकार याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभाग, बारामती यांनी रंगेहाथ पकडले आहे. विकास किसनराव ढेकळे, ( वय 50, पद नगर रचनाकार (Town Planner) नगरपरिषद, ता. बारामती, जि. पुणे) असे नगर रचनाकाराचे नाव आहे. नगर रचनाकार याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना शहरातील ऑक्सीजन जिममधून एसीबीने ताब्यात घेत अटक केली. बारामती नगरपरिषदेचा नगररचना विभाग सातत्याने विविध कारणांनी चर्चेत असतो. ढेकळे हे गेल्या दोन महिन्यांपूर्वीच पुण्याहून बारामती नगरपरिषदेत बदलून आले आहेत.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,यातील तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची एक फर्म असून त्यांचे (रुई) बारामती येथे निर्मीत विहार इमारत बी विंग-1 या गृह प्रकल्पाचा प्रस्ताव नगरपरिषद बारामती येथे दाखल केलेला होता. सदरचा प्रस्ताव मंजूर करण्याकरीता विकास ढेकळे, नगर रचनाकार यांनी तक्रारदाराकडे दोन लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. त्या संदर्भात तक्रारदार यांनी तक्रार 18 मार्चच्या दरम्यान एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
एसीबीने तक्रारदार यांच्या तक्रारीवरून पडताळणी करून (19 मार्च) विकास ढेकळे, नगर रचनाकार यांचेकडे पंचासमक्ष पडताळणी केली असता, त्यांनी तक्रारदाराचे काम करण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच मागणी करुन, तडजोडीअंती 1.75 लाख रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. विकास ढेकळे यांनी मागितलेल्या लाच रक्कमेपैकी पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून एक लाख रुपये ऑक्सीजन जिम, बारामती येथे पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. बारामती पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली दयानंद गावडे सहाय्यक पोलीस आयुक्तु / पोलीस उप अधीक्षक पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.