Narayan Rane : नारायण राणेंचा कणकवलीत धमाका! “दाऊदच्या माणसाला माझी टीप देणाऱ्याला ठार मारणार होतो”; बाळासाहेबांचा ‘तो’ किस्सा सांगितला

Narayan Rane Latest News : जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राणेंचे स्फोटक वक्तव्य; “आता कुठेतरी थांबायला पाहिजे” म्हणत निवृत्तीचे संकेत
कणकवली | जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले आहे. कणकवली येथे झालेल्या भव्य सभेत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत संवेदनशील आणि जुना किस्सा उघड केला. एका उपशाखाप्रमुखाने दाऊद इब्राहिमच्या माणसाला आपली ‘टीप’ दिल्याचे समजल्यानंतर आपण त्याला ठार मारायला निघालो होतो, मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दामुळे त्याला जीवनदान दिले, असा खळबळजनक खुलासा राणेंनी केला.
‘तो’ प्रसंग आणि बाळासाहेबांचा शब्द
नारायण राणे यांनी सभेत सांगितले की, “एका मित्राने मला सावध केले की तुझी टीप दिली गेली आहे. टीप देणाऱ्याचे नाव समजताच मी थेट त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या पत्नीला सांगितले की मी तुझ्या पतीला ठार मारणार. दुसऱ्या दिवशी बाळासाहेबांनी मला बोलावले. तिथे तो उपशाखाप्रमुखही बसला होता. बाळासाहेबांनी मला विचारले, ‘तू याला मारणार म्हणतोस?’ मी म्हणालो, ‘हो, कारण याने दाऊदच्या माणसाला माझी टीप दिली आहे. हा जिवंत राहिला तर मी मरणार, त्यापेक्षा मी याला मारून स्वतःला वाचवेन.’ पण तेव्हा बाळासाहेबांनी मला विनंती केली की त्याला जीवनदान दे. साहेबांचा शब्द प्रमाण मानून मी त्याला तेव्हा सोडून दिले.”
राजकारणातून निवृत्तीचे संकेत?
याच सभेत नारायण राणे यांनी त्यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत मोठे विधान केले. ते म्हणाले, “आता वय वाढत आहे आणि शरीर थकत चालले आहे. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. नड्डा साहेबांनी आग्रह धरला म्हणून मी निवडणूक लढवली. पण आता कुठेतरी थांबायला पाहिजे असे मला वाटते. माझे दोन्ही मुले (निलेश आणि नितेश) आता राजकारणात स्थिर झाली आहेत, ते यापुढील विकासाचे राजकारण सांभाळतील. राणे कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहणार आहोत.”
विरोधकांना इशारा
“ज्यांना राणेंना संपवायचे आहे त्यांनी लक्षात ठेवावे, राणे पुरून उरला आहे. माझी रास ‘गुरू’ आहे आणि ती खूप स्ट्राँग आहे,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. घमेंडखोर असल्याची टीका करणाऱ्यांना उत्तर देताना त्यांनी म्हटले की, “मी कोणापेक्षाही कमी नाही, याचा मला अभिमान वाटतो.”


