
Balasaheb Thorat On Election : “मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय निवडणुका नको”; भाजपच्या ‘मुक मोर्चा’वर थोरात यांचा निशाणा
मुंबई :- मतदार याद्यांमधील कथित गैरव्यवहार आणि मतचोरीच्या विरोधात आज (1 नोव्हेंबर) निघालेल्या ‘सत्याच्या मोर्चा’मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना आयोगाने दिलेले उत्तर फेटाळत त्यांनी आयोगाला ‘इतिहासातील सर्वात बोगस उत्तर’ ठरवले.
निवडणूक आयोगावर थेट आरोप
बाळासाहेब थोरात म्हणाले की, राहुल गांधींनी मतचोरी होत असल्याचे दाखवून दिले, त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर थातूरमातूर होते. “आयोगाने कोणतीही चौकशी केली नाही, खुलासा केला नाही. महाराष्ट्रातील निवडणुकाही अशाच बोगस मतदार यादीतून झाल्या आहेत,” असा थेट आरोप थोरात यांनी केला.
निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागण्या
निवडणूक आयोगाला केलेल्या मागण्यांबद्दल बोलताना थोरात म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत जी मतदार यादी वापरली गेली, ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरू नका, असे आम्ही आयोगाला सांगितले होते. आम्ही सर्व लोकशाही मानणारे नेते तिथे उपस्थित होतो. आम्ही अनेक उदाहरणे दिली, पण आम्हाला उत्तर मिळाले नाही.”
सत्ताधाऱ्यांवर टीका
यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपच्या ‘मुक मोर्चा’वरही टीका केली. “सत्ताधाऱ्यांनी मुक मोर्चा काढला. या मोर्चात निवडणूक आयोग सामील झाला आहे की काय, असे वाटते,” असा उपरोधिक टोला थोरात यांनी लगावला. त्यांनी स्पष्ट केले की, विधानसभेच्या यादीत घोळ आहे आणि बोगस लोकांची नोंद आहे. त्यामुळे, या याद्या दुरुस्त झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, हीच त्यांची प्रमुख मागणी असल्याचे थोरात यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले.


