Balasaheb Thackeray Death Anniversary : 11 वर्षांनंतर भावनिक क्षण! बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी उद्धव-राज ठाकरे स्मृतीस्थळावर एकत्र

•संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित; आजारपणातही संजय राऊतांनी मोडली विश्रांती, ‘साहेबां’ना वाहिले अभिवादन
मुंबई :- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13 वा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने दादर येथील शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळावर राज्यभरातील शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. याच ठिकाणी आज 11 वर्षांनंतर अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा राजकीय क्षण पाहायला मिळाला.
माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह सहकुटुंब स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी पोहोचले. त्यानंतर, मनसेप्रमुख राज ठाकरे हे देखील बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यासह स्मृतीस्थळी आले. अभिवादन झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 11 वर्षांनंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर एकत्र बसले आणि त्यांच्यात काहीवेळ चर्चाही झाली. दोन्ही बंधूंना एकत्र पाहून उपस्थित शिवसैनिक भावनाविवश झाल्याचे दिसून आले.
गंभीर आजारामुळे 31 ऑक्टोबरपासून सार्वजनिक जीवनापासून दूर असलेले आणि सक्तीची विश्रांती घेत असलेले राज्यसभा खासदार संजय राऊत यांनाही आज राहावले नाही. ते डॉक्टरांचा सल्ला बाजूला ठेवत शिवाजी पार्कवर दाखल झाले. संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावलेले संजय राऊत हे त्यांचे बंधू सुनील राऊत यांचा हात पकडून स्मृतीस्थळापर्यंत चालत गेले आणि त्यांनी लाडक्या साहेबांचे दर्शन घेतले.
या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा निर्माण होत असलेले सलोख्याचे संबंध महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



