महाराष्ट्र

Balaram Patil : महाविकास आघाडीच्या मार्फत शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवून विजयी होणारच बाळाराम पाटील

पनवेल : पनवेल विधानसभा 188 अंतर्गत होणार्‍या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या मार्फत शिट्टी या चिन्हावर मी ही निवडणूक लढवित असून निश्‍चितच महाविकास आघाडीने महाराष्ट्रभर तसेच रायगड जिल्ह्यासह पनवेल तालुक्यात स्थानिक भूमीपुत्रांसाठी केलेली कामे ही जनतेच्या समोर असल्याने तसेच गेली 15 वर्षे या आमदाराने केले काय? असा प्रश्‍न पनवेलवासिय विचारत असल्याने माझा विजय निश्‍चितच असल्याचे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी Balaram Patil कामोठे येथील महाविद्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेेमध्ये केले आहे.

या पत्रकार परिषदेला उमेदवार बाळाराम पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी.आर.पाटील, काँग्रेस पनवेल जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, पनवेल शहर जिल्हा युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, समाजवादी पक्ष जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, मा.नगरसेवक शंकर म्हात्रे, प्रमोद भगत, शेकाप कामोठे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उमेदवार बाळाराम पाटील यांनी महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांंनी गेल्या 15 वर्षात केले काय? असा सवाल करत पनवेल एस.टी.स्टँण्डचा प्रश्‍न प्रलंबित, रस्त्यावर पडलेले खड्डे, वाढती ट्रॅफिक, पाण्याचा प्रश्‍न, टॅक्सचा प्रश्‍न, नैनाचा प्रश्‍न आदी प्रश्‍न सोडविण्यास हे आमदार अपयशी ठरले असून आगामी काळात जनता यांना घरी बसवेल, असेही त्यांनी सांगितले. आज जरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे उमेदवार देण्यात आला असला तरी वरिष्ठ पातळीवर नेते मंडळींशी चर्चा होवून ते सुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्‍वास बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला आहे. शिट्टी हे चिन्ह घराघरात पोहोचविण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी आजपासून कामाला लागले असून किमान तीन वेळा आम्ही प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधू असेही त्यांनी सांगितले. ही निवडणूक जिंकण्याच्या इर्षेनेच आम्ही मैदानात उतरलो असून कोणत्याही परिस्थितीत विजय हा आमचाच असेल, असेही बाळाराम पाटील यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेस पनवेल जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी सुद्धा काँग्रेस पक्ष बाळाराम पाटील यांच्या पाठीशी ठाम उभा असून दिवस रात्र एक करून विजय संपादन करू, असेही त्यांनी सांगितले. तर मराठा समाजाचे नेते गणेश कडू यांनी सुद्धा जरांगे पाटील जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य आहे, मराठा समाज सुद्धा बाळाराम पाटील यांच्या पाठीशी ठाम उभा राहील, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0