
Badlapur Political News : कट्टर विरोधक असलेल्या भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवाराला उघड समर्थन; ‘पक्षादेशाची प्रतारणा करणाऱ्यांना मतदान करू नका,’ शहरप्रमुखांचे संतप्त आवाहन
बदलापूर :- भाजपविरोधात राज्यात कठोर भूमिका घेणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात, ठाणे जिल्ह्यातील कुळगाव-बदलापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये मोठा राजकीय हादरा बसला आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना, ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 हून अधिक अधिकृत उमेदवारांनी थेट कट्टर विरोधक असलेल्या भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रूचिता घोरपडे यांना उघड पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपने तब्बल 9 उमेदवारांनी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे.
2022 पासून भाजपवर सातत्याने टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भूमिकेला केराची टोपली दाखवणारा हा धक्कादायक प्रकार आहे. ‘अ’ वर्ग नगरपरिषद असलेल्या बदलापूरमध्ये हा संघर्ष विकोपाला गेला असून, थेट उमेदवारांनीच पक्ष नेतृत्वाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत उघड फूट पडली आहे. येथे शिंदेंच्या शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस युतीमध्ये थेट लढत होती. ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रिया गवळी या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतानाही ही ‘गद्दारी’ समोर आली आहे.
या अनपेक्षित भूमिकेमुळे संतप्त झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर पाटील यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पक्षादेशाची प्रतारणा करणाऱ्या या उमेदवारांना ‘गद्दार’ संबोधले आहे. “आमच्या पक्षाच्या सहा अधिकृत उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशाची प्रतारणा करणाऱ्या या गद्दारांना शिवसैनिकांनी मतदान करू नये,” असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
तसेच, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला फायदा व्हावा म्हणून पक्षचिन्ह दिलेले हे उमेदवार बहुतांश तिसऱ्या आघाडीतील असून, त्यांनी ‘पैशांसाठी’ हा निर्णय घेतला असावा, अशी प्रतिक्रियाही पाटील यांनी दिली आहे.
या पाठिंब्यामुळे बदलापूर पश्चिम भागातील वडवली, बेलवली आणि स्थानक परिसरातील भाजपच्या उमेदवारांना किती फायदा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


