देश-विदेश
Trending

Rahul Gandhi : ‘सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण मदत करावी’; राहुल गांधींची मराठवाड्यातील नुकसानीची दखल

Rahul Gandhi On Maharashtra : अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिके नष्ट; जीवितहानीवरही व्यक्त केली चिंता

नांदेड :- महाराष्ट्रावर, विशेषतः मराठवाड्यावर कोसळलेल्या अतिवृष्टीच्या संकटाची दखल घेताना, लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण मदत करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. त्यांनी या आपत्कालीन परिस्थितीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आणि गरजूंना मदत करण्याचे आवाहनही केले.

गेल्या दीड महिन्यापासून नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीत मोठे नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवरील खरीप पिके नष्ट झाली असून, जीवितहानी आणि जनावरांचेही मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधी यांना दिली. नांदेडमधील स्थानिक नेते संदीपकुमार देशमुख यांनीही यापूर्वीच गांधी यांना सविस्तर पत्र पाठवून परिस्थितीची जाणीव करून दिली होती.

फेसबुकद्वारे व्यक्त केली भावना

मराठवाडा आणि राज्याची एकंदर परिस्थिती समजल्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या फेसबुक पेजवरून याविषयी भावना व्यक्त केली. त्यांनी सरकारला संपूर्ण मदत करण्याची मागणी केली आणि या संकटात काँग्रेस कार्यकर्त्यांना सक्रियपणे मदतकार्य सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

या संदर्भात संदीपकुमार देशमुख यांनी सांगितले की, मराठवाड्यातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी राहुल गांधी यांनी या भागाचा दौरा करावा, अशी विनंती आम्ही त्यांना पुन्हा करणार आहोत.

नांदेड शहरात बचावकार्य सुरू

दरम्यान, गेल्या 24 तासांत नांदेड जिल्ह्यात कुठेही जीवितहानी झाली नसली तरी, गोदावरी नदीवरील विष्णुपूरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या भागात पूरसदृश स्थिती कायम आहे. नांदेड शहरात पूरबाधित भागातून सुमारे साडे चारशेहून अधिक (454) लोकांना सुरक्षित स्थळी हलवून निवारा केंद्रांमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासाठी महानगरपालिकेने आवश्यक ती व्यवस्था केली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0