Badlapur Crime News : बदलापूर पुन्हा हादरले! 4 वर्षांच्या चिमुरडीवर स्कूल बसमध्ये अत्याचार; मुख्याध्यापिकेने चालकाची बाजू घेतल्याचा पालकांचा आरोप

•बसमध्ये महिला अटेंडंट नव्हतीच; नराधम चालकाला अटक, संतप्त महिलांनी स्कूल व्हॅन फोडली; फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा
बदलापूर | बदलापूर पश्चिमेकडील एका नामांकित खासगी शाळेत नर्सरीमध्ये शिकणाऱ्या चार वर्षांच्या मुलीसोबत बस चालकाने गैरकृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या गंभीर घटनेनंतरही शाळेच्या मुख्याध्यापिकेने पालकांना सहकार्य करण्याऐवजी चालकाचीच पाठराखण केल्याचा खळबळजनक आरोप पालकांनी केला आहे. पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली असून त्याच्यावर पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
नेहमीप्रमाणे दुपारी 12.30 वाजता मुलगी घरी न पोहोचल्याने आईने चालकाला फोन केला. त्यानंतर तब्बल दीड तासाने मुलगी घरी आली, मात्र ती प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होती. आईने विश्वासात घेऊन विचारले असता, चालकाने आपल्या गुप्तांगाला स्पर्श केल्याचे चिमुरडीने सांगितले.
शाळेचा आडमुठेपणा आणि पालकांचा संताप पालक तक्रार घेऊन शाळेत गेले असता, मुख्याध्यापिकेने चालकाला केबिनमध्ये बोलावले. त्या नराधमाला पाहताच चिमुरडी थरथर कापली आणि पालकांच्या मागे लपली. इतके स्पष्ट संकेत मिळूनही शाळा प्रशासनाने हा विषय दाबण्याचा प्रयत्न केल्याने पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठले. या बसमध्ये नियमानुसार महिला अटेंडंट असणे अनिवार्य असताना, ती नसल्याचे तपासात उघड झाले आहे.
बदलापुरात संतापाची लाट घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली. संतप्त झालेल्या संगीता चेंदवणकर यांनी संबंधित स्कूल व्हॅनवर दगडफेक करून आपला निषेध व्यक्त केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काल मध्यरात्री फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी आणि स्कूल व्हॅनची कसून तपासणी केली असून काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.



