नागपूर

Bachchu Kadu Morcha : शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा नागपुरात विराट मोर्चा; महामार्गांवर ठिय्या, बावनकुळेंशी शाब्दिक चकमक

•’आम्ही नागपुरातच भेटू, मुंबईत येणार नाही’; आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा आरोप कडू यांनी फेटाळला

नागपूर :- शेतकरी कर्जमाफी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेला विराट मोर्चा आज नागपुरात दाखल झाला आहे. या मोर्चाच्या धडकेमुळे नागपूर-वर्धा आणि नागपूर-जबलपूर या प्रमुख महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून, शहराच्या आसपासचे चार महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी नागपूर-जबलपूर महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात फोनवर संभाषण झाले, ज्यात बैठकीच्या स्थळावरून शाब्दिक चकमक झाली.

बच्चू कडूंची मागणी: ‘बैठक नागपुरातच घ्या’

बच्चू कडू यांनी आंदोलनादरम्यान आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “आमचे आंदोलन सुरू असताना आम्ही ते सोडून मुंबईतील बैठकीला येऊ शकत नाही. तुम्ही नागपूरला या. नागपूरला मंत्रालय आहे, तिथे बैठक घ्या. तुम्हाला जातीयवादी मोर्चांमध्ये जाता येतं, तर शेतकऱ्यांच्या मोर्चात यायला काय झाले?” त्यांनी आरोप केला की, यापूर्वी दोन बैठका झाल्या, पण फक्त अपंगांसाठीच निर्णय झाले, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहिले. विमानातून जाणे-येणे आणि बैठकीसाठी पूर्ण दिवस वाया जाईल, ज्यामुळे आंदोलन हातात राहणार नाही. सरकारने बैठकीच्या नावाखाली आपले आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न चालवला आहे, असा गैरसमज होतोय, असेही कडूंनी स्पष्ट केले.

बावनकुळेंचा मुंबईतील बैठकीसाठी आग्रह

दुसरीकडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांना मुंबईतील उच्चस्तरीय बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली. बावनकुळे म्हणाले की, मी 26, 27, आणि 28 तारखेला बच्चू कडूंसह इतर नेत्यांशी बोललो होतो आणि त्यानुसार बैठक निश्चित झाली होती. त्यांनी येण्याचे कबूल केले होते, पण आता ते आले नाहीत. त्यांनी किमान एका प्रतिनिधीला तरी मुंबईतील बैठकीला पाठवावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

तोडगा हा चर्चेतूनच निघतो, असे सांगत बावनकुळे यांनी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले. आंदोलकांना अटक करण्याचा प्रश्नच नाही, आम्ही फक्त बैठकीसाठी बोलावतोय. आम्ही मुघल विचारांचे नाही, असे म्हणत त्यांनी बच्चू कडू यांनी केलेला अटक करण्याचा आरोप फेटाळून लावला. बैठक ठरली असताना कोणीही प्रतिनिधी न आल्याने ती बैठक रद्द करावी लागल्याचेही त्यांनी नमूद केले.

सध्या बच्चू कडू आणि आंदोलक शेतकरी आपल्या मागण्यांवर आणि बैठक नागपूरमध्ये घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत, तर चंद्रशेखर बावनकुळे मुंबईतील बैठकीसाठी आग्रह धरत आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या आंदोलनावर तोडगा कधी निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

vivek

Recent Posts