
Bachchu Kadu Latest News : सरकारची अद्याप दखल नाही; प्रहार कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता
पुणे | प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा मा.राज्यमंत्री बच्चू कडू Bachchu Kadu यांनी शेतकरी, दिव्यांग आणि वंचित घटकांच्या मागण्यांसाठी 8 जूनपासून सुरू केलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन आता अधिक तीव्र रूप धारण करत आहे. सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस दखल न घेतल्याने प्रहार कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. या असंतोषाला भीषण वळण मिळालं, जेव्हा प्रहारच्या वरूड तालुक्यातील संपर्क प्रमुख अजय भागवतराव चौधरी (वय 35) यांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ विष प्राशन केलं.
ही घटना शुक्रवारी घडली असून, चौधरी यांच्यावर वरूड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे निराश होऊन त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे प्रहार कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली असून, आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कडू यांची प्रकृती खालावली; उपचारांना ठाम नकार
दरम्यान, उपोषणाच्या सहाव्या दिवशी बच्चू कडू यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यांना सकाळी उलट्या झाल्या असून, डॉक्टरांनी सलाईन लावण्याचा सल्ला दिला. मात्र, “मागण्या पूर्ण होईपर्यंत औषधोपचार घेणार नाही,” असा ठाम निर्धार करत त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
राज्यभरातून आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असला तरी सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


