मुंबई
Trending

Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आंदोलनाचा तिढा सुटणार; बच्चू कडूंसह शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना

Bacchu Kadu Farmer Protest : नागपूर-वर्धा महामार्गावरील आंदोलन स्थगित; सायंकाळी मुख्यमंत्र्यांशी उच्चस्तरीय चर्चा

नागपूर :- शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू Bacchu Kadu यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा तिढा अखेर सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्याशी मुंबईत चर्चा करण्याचे ठरल्यानंतर, आज (गुरुवार) बच्चू कडू आणि इतर प्रमुख नेते चर्चेसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

मुंबईकडे झालेले शिष्टमंडळ

बच्चू कडू, शेतकरी नेते अजित नवले, महादेव जानकर, वामनराव चटप आणि रविकांत तुपकर या प्रमुख नेत्यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. हे सर्व नेते आज दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी नागपूर-मुंबई विमानाने मुंबईकडे रवाना झाले. सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत ही उच्चस्तरीय बैठक होणार आहे.

चर्चेला सुरुवात

काल रात्री उशिरा राज्यमंत्री पंकज भोयर आणि ॲड. आशीष जयस्वाल यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि चर्चेचे निमंत्रण स्वीकारले. यानंतर आंदोलकांनी रस्ते मोकळे करून नियोजित ठिकाणी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

आंदोलकांची आक्रमक भूमिका

यापूर्वी, आंदोलकांनी सरकारला दुपारी 4 वाजता चर्चेची वेळ दिली होती, मात्र मंत्री उशिरा पोहोचले. यावरून आंदोलकांनी मंत्र्यांना फैलावर घेतले. उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर तुम्ही चर्चेला आलात, यावरून हे सर्व राज्य सरकारने ठरवून केल्याचे दिसते, अशी टीका आंदोलकांनी केली. “कर्जमाफी करणार असे ठोस आश्वासन दिले, तरच या चर्चेला अर्थ आहे,” असे आंदोलकांनी मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले होते.

न्यायालयाचा हस्तक्षेप

बुधवारी उच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल करून घेत सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलकांना नागपूर-वर्धा महामार्गावरून हटवण्याचे निर्देश नागपूर पोलिसांना दिले होते. परंतु, मागण्या पूर्ण होईपर्यंत हलणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे परिसरात तणाव वाढला होता. काही आंदोलकांनी रेल्वे रुळांवर उतरून रेल्वे रोकोचा प्रयत्न केला, तर काही जणांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर टायर जाळत सरकारचा निषेध व्यक्त केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0