
मुंबई : मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाच्या दबावाखाली राज्य सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयाचा (GR) तत्काळ रद्द करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग, मुंबई तर्फे करण्यात आली आहे.
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष बबनराव मदने Babanrao Madne यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ओबीसी NT/VJNT समन्वय समितीसोबत बुधवारी (३ सप्टेंबर २०२५) दुपारी १२:३० वाजता बांद्रा येथील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “हैद्राबाद गॅझेटच्या नावाखाली घाईघाईत काढलेला हा GR हा मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठीचा मागील दाराने केलेला प्रयत्न आहे. २०२४ मध्ये काढलेल्या सगेसोयरेच्या GR प्रमाणेच यामध्ये शब्दछल करून मोठ्या प्रमाणात मराठा समाज ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणार आहे, ज्यामुळे मुळ ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात येईल.”
या पार्श्वभूमीवर संबंधित GR तात्काळ रद्द करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
निवेदन सादरीकरणावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई उपाध्यक्ष स्वामिनीताई चव्हाण, महेंद्र साळुंके, भूषण नागवेकर, भुल्लर यादव, धनगर समाजोन्नती मंडळाचे मुंबई अध्यक्ष शांताराम दिघे, राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विशाल संगारे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष लल्लन पाल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


