मुंबई

दिवाळीची मंगलमय सुरुवात! आज ‘वसुबारस’: जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि गायीच्या पूजेमागील धार्मिक महत्त्व

•वसुबारस म्हणजे ‘गोवत्स द्वादशी’; कार्तिक कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी साजरा होणारा समृद्धीचा सण

मुंबई :- दिवाळी या सर्वात मोठ्या आणि मंगलमय सणाची सुरुवात वसुबारस या पवित्र सणाने होते. भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या या सणाला ‘गोवत्स द्वादशी’ असेही म्हटले जाते.वसुबारस या शब्दाचा अर्थ आहे: वसु म्हणजे द्रव्य (धन, संपत्ती) आणि बारस म्हणजे द्वादशी. पंचांगानुसार, हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी साजरा केला जातो. भारत कृषिप्रधान देश असल्याने हिंदू धर्मात गायीला गोमाता मानले जाते. या दिवशी महिला गाय आणि तिच्या वासराची पूजा करून जीवनात समृद्धी आणि शांती येण्याची प्रार्थना करतात.

वसुबारस पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त

वसुबारस तिथीची सुरुवात: शुक्रवार, 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 17 वाजून 12 मिनिटांनी.

वसुबारस तिथीची समाप्ती: शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 18 मिनिटांनी.

पूजेचा शुभ मुहूर्त (प्रदोषकाळ): आज सायंकाळी 4 वाजून 14 मिनिटांपासून ते 7 वाजून 73 मिनिटांपर्यंत.

वसुबारसच्या दिवशी पूजा करण्याची पद्धत

वसुबारसच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान करावे. घराबाहेर सुंदर रांगोळी काढावी.

गो-पूजन: जर घरात गाय किंवा वासरू असेल, तर त्याची विधिवत पूजा करावी. घरात गाय नसल्यास गाय किंवा तिच्या वासराची मूर्ती अथवा फोटो आणून पूजा करावी.

नैवेद्य: गाईला ओवाळून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.

उपवास: अनेक महिला या दिवशी उपवास करतात आणि गाईला हिरवे गवत, गूळ आणि चणे अर्पण करतात.

गाय पूजनामागील इतिहास आणि महत्त्व

कामधेनूची उत्पत्ती: पौराणिक मान्यतेनुसार, समुद्रमंथनातून जेव्हा 14 रत्ने बाहेर आली, तेव्हा त्यातून कामधेनूची (देवतांची गाय) देखील उत्पत्ती झाली. म्हणूनच हिंदू धर्मामध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

धार्मिक महत्त्व: ऋग्वेद, अथर्ववेद आणि स्कंद पुराणात गायीच्या महत्त्वाचा विशेष उल्लेख आहे. गाईला ‘गोः सर्वस्य जननी’ म्हणजेच संपूर्ण सृष्टीची आई म्हटले आहे. धर्मशास्त्रांनुसार, गाईमध्ये ३३ कोटी देवता वास करतात असे मानले जाते. त्यामुळे केवळ गायीचे पूजन केल्याने सर्व देवतांचे पूजन केल्याचे पुण्य मिळते.

समृद्धीचे प्रतीक: या दिवशी गाय आणि वासराची पूजा केल्याने घरात समृद्धी, शक्ती आणि तेजाचे प्रतीक असलेले “वसु” येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. गाईची सेवा केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी नांदते आणि सर्व पापांचा नाश होऊन पुण्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे.

सांस्कृतिक महत्त्व: वसुबारस हा सण केवळ धार्मिक नसून, शेतीप्रधान संस्कृतीत गाईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि तिला कुटुंबाचा अविभाज्य भाग मानण्यासाठी साजरा केला जातो.

vivek

Recent Posts