मुंबई

सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न; ‘सनातनचा अपमान सहन नाही’ म्हणत वकिलाने बूट फेकला

BR Gavai Supreme Court Incident : सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला; राजकीय वर्तुळात तीव्र संताप, हल्ल्याचा निषेध आणि कारवाईची मागणी.

“हा लोकशाहीवरचा घोर अवमान” – शरद पवार; “संविधानावरील हल्ला” – पृथ्वीराज चव्हाण, तर विजय वडेट्टीवार यांची कठोर कारवाईची मागणी.

मुंबई :- देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आज एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. सुनावणी सुरू असताना, एका वकिलाने थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वकिलाने सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. BR Gavai Supreme Court Incident

हल्ला करणाऱ्या वकिलाला कोर्टाबाहेर काढण्यात आले, तेव्हा तो “सनातनचा अपमान सहन करणार नाही” असे जोरजोरात ओरडत होता. या घटनेमुळे न्यायव्यवस्थेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

राजकीय नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर राज्यातील प्रमुख नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शरद पवार:
शरद पवार यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला. ते म्हणाले, लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते. त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे.

आपल्या देशात पेरलं जाणारं विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. ह्या घटनेचा मी निषेध करतो व कोणत्याही परिस्थितीत भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत, ह्यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देतो.

संजय राऊत

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की,सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश भुषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न हा डॉ आंबेडकर आणि संविधानावरील थेट हल्ला आहे!
हल्लेखोर बेगडी हिंदुत्ववादी आहेत
भाजपच्या प्रशिक्षण केंद्राची ही निर्मिती आहे!

पृथ्वीराज चव्हाण:
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा हल्ला संविधानावरचा हल्ला असल्याचे म्हटले आहे. “आज सर्वोच्च न्यायालयात भारताचे मुख्य न्यायमूर्ती (CJI) यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. द्वेष पसरवण्यासाठी सांप्रदायिक शक्ती किती टोकाला जाऊ शकतात, याचे हे उदाहरण आहे. हा हल्ला संविधानावरचा हल्ला आहे, भारताच्या मूळ संकल्पनेवरचा हल्ला आहे. या असहिष्णुतेला प्रोत्साहन देणाऱ्या संघटनांवर सरकारने कठोर कारवाई करावी.

विजय वडेट्टीवार:
“लोकशाही आणि संविधानावर ज्यांचा विश्वास आहे त्यांचा आज अपमान झाला आहे,” अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते म्हणाले, “सनातनी हिंसक कसे होऊ शकतात? न्यायालयाच्या सर्वोच्च स्थानावर बसलेल्या व्यक्तीवर भ्याड हल्ला करणे म्हणजे देशात गुंडगिरी सुरू आहे. हिंदू धर्माचे नाव घेऊन असे कृत्य करणाऱ्या या विकृत वृत्तीवर कडक कारवाई झाली पाहिजे!”

जितेंद्र आव्हाड:
जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेला ‘ढासळणाऱ्या मानसिकतेचा ज्वर’ म्हटले आहे. “एका सडक्या मनोप्रवृत्तीचा सुप्रीम कोर्टातला वकील जोरजोरात ओरडतो आणि थेट मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने चप्पल फेकतो… ह्या घटना कसल्या द्योतक आहेत,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राजेंद्र गवई यांची प्रतिक्रिया:

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे बंधू राजेंद्र गवई यांनी या घटनेचा निषेध करत, हा एका मानसिक दृष्ट्या संतुलन बिघडलेल्या व्यक्तीचा भ्याड हल्ला असल्याचे म्हटले आहे. फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या अनुयायांना त्यांनी संविधानाच्या मार्गाने जाण्याचे आणि कोणताही अनुचित प्रकार न घडवण्याचे आवाहन केले आहे.

vivek

Recent Posts