क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Assistant Commissioner Mahesh Patil : मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर ‘सक्तीची रजा’! – महेश पाटील यांच्यावर 80 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याचा आणि मारहाणीचा गंभीर आरोप

Assistant Commissioner Mahesh Patil : बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांचा मोठा निर्णय; ‘बाऊंसर’कडून मारहाणीची ध्वनिचित्रफित व्हायरल, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.

मुंबई :- मुंबई महापालिकेच्या एस विभाग (भांडूप) कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील Assistant Commissioner Mahesh Patil यांना अत्यंत गंभीर आरोपांमुळे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील यांच्यावर एका पुनर्विकास प्रकल्पात स्वस्त दरात घरे मिळतील असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांचे तब्बल 80 कोटी रुपये हडपल्याचा आणि व्यावसायिकाला गुंडांच्या मदतीने मारहाण केल्याचा आरोप आहे.

काय आहेत महेश पाटील यांच्यावरील आरोप?

गुन्हेगारी जगतात चर्चेत आलेल्या या प्रकरणात व्यावसायिक निशित पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

पाटील यांनी वांद्रे येथील एका पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा फायदा होईल, असे प्रलोभन दाखवत अनेक पोलीस अधिकारी, पालिका अधिकारी आणि अभिनेते यांसारख्या बड्या लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. पाटील यांनी या गुंतवणूकीतील सुमारे 80 कोटींची रक्कम हडपल्याचा पटेल यांचा आरोप आहे.

पाटील यांनी केवळ गुंतवणूक घोटाळाच केला नाही, तर निशित पटेल याला भाडोत्री गुंडांच्या सहाय्याने मारहाण व धमक्या दिल्या. मारहाणीची एक ध्वनिचित्रफित (व्हिडिओ) देखील प्रसारित झाली आहे.

पटेल यांचे अपहरण करून त्यांचे दोन मोबाईल हिसकावून घेतले आणि गुंतवणूकदारांचे पैसे आपण देणे लागतो, अशी जबरदस्तीने कबुली वदवून घेतल्याचा आरोपही पटेल यांनी केला आहे.

प्रशासनाचा पवित्रा

निशित पटेल यांनी बड्या लोकांकडून पाटील यांच्यावतीने ही कोट्यवधींची रक्कम स्वीकारली होती. मात्र, आता सहाय्यक आयुक्ताने हात झटकल्यामुळे हे प्रकरण पटेल यांच्या अंगलट आले आहे. या गंभीर आरोपांची ध्वनिचित्रफित प्रसारित झाल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार झाल्यानंतरही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. तरीही, प्रशासनाने या प्रकरणात महेश पाटील यांचे नाव आल्यामुळे त्यांच्यावर तातडीने एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली आहे.

पाटील यांचा आरोप फेटाळला

दुसरीकडे, सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.ध्वनिचित्रफितीतील आवाज आपला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, सर्व आरोप खोटे, चुकीचे आणि निराधार असल्याचे सांगितले.पाटील यांनी स्पष्ट केले की,एनआरआयने स्वतःच गुंतवणूकदारांचे पैसे जमा केले आहेत आणि त्यांचा किंवा तक्रारीत उल्लेख असलेल्या इतरांचा त्या व्यवहारांशी कोणताही संबंध नाही. पटेल यांच्याकडे काही पुरावे असल्यास ते त्यांनी सादर करावेत, असे आव्हानही पाटील यांनी दिले आहे. पोलिसांच्या चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल आणि आपण पोलिसांना सर्व सहकार्य करू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0