Mumbai Crime News : “पोलीस वर्दीच्या आड व्यवहार!” खेरवाडीतील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तिघांवर निलंबनाचा धडाका

•कर्तव्यावर नसतानाही ‘खाजगी भानगडी’! आर्थिक वादात पोलिसांचा हस्तक्षेप उघड
मुंबई :- खाकी वर्दीतील जबाबदारी सोडून खाजगी वादात मध्यस्थी केल्याचा गंभीर प्रकार वांद्रेच्या खेरवाडी पोलीस ठाण्यात उघड झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस शिपायांनी ड्युटीवर नसतानाही दोन व्यक्तींमधील आर्थिक वाद ‘स्वतःहून’ हाताळल्याचे समोर आले असून, पोलिसांच्या अशा गैरवर्तनामुळे विभागात एकच खळबळ उडाली आहे. या तिघांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
निलंबित अधिकारी आणि शिपाई हे सर्व खेरवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी दिवसपाळीमध्ये कर्तव्यावर नसताना, तक्रारदार मुफ्ती नसीमुद्दीन सुखानु शेख आणि मेहूल मेहता ऊर्फ शफी सूर्या यांच्यातील आर्थिक वादात मध्यस्थी केली होती, अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली.
या कारवाईचे आदेश अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) यांनी नुकतेच जारी केले आहेत. प्राथमिक चौकशीनंतर सादर झालेल्या अहवालावरून संबंधित तिघांच्या कारभारावर शंका घेण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती मिळताच तत्काळ तिघांनाही निलंबित करण्यात आले.
सध्या या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी पोलीस पदाचा दुरुपयोग केला का? त्यांनी कायदेशीर प्रक्रिया डावलली का? याचा तपशीलवार आढावा घेतला जात आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


